अकोला: संकटं येतच असतात; आत्महत्या हा त्यावरील पर्याय नाही. त्यामुळे शेतकर्यांनी धीर सोडायला नको व या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, असा आशावाद यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील विधान परिषदेचे आमदार ख्वाजा बेग यांनी व्यक्त केला. आमदार ख्वाजा बेग यांनी ४ डिसेंबर रोजी बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथे जाऊन आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. बाळापूर तालुक्यातील मनारखेड या गावातील शेतकरी काशीराम भगवान इंदोरे या शेतकर्याने शेतामध्ये स्वत:ची चिता रचून त्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण वर्हाड हादरले असून, विविध पक्षांचे नेते मृत शेतकर्याच्या कुटुंबीयांना भेट देत आहेत. ४ डिसेंबर रोजी आ. ख्वाजा बेग यांनी त्यांची भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील व आर्णीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हरीश कुडे होते. बेग यांनी इंदोरे कुटुंबीयांचे सांत्वन केले. आत्महत्यांची कारणे काय, त्यावर उपाययोजना काय याचा शासनाने सारासार विचार करून निर्णय घेण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकर्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करू नये!- ख्वाजा बेग
By admin | Published: December 06, 2014 12:46 AM