अकोला : येत्या खरीप हंगामासाठी शेतकर्यांनी मशागतीच्या कामांना सुरुवात केली असून, शेतकर्यांनी आता बहुपीक व एकीकृत शेती पद्धतीचा वापर करावा आणि जलसंधारण व समतल रेषेवर भर देण्याची गरज असल्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकर्यांना दिला आहे.शेतीमध्ये नियोजन महत्त्वाचे आहे. याकरिता साधन संपत्ती, जमीन, पाणी, भांडवल, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, बाजारपेठ व गत काळातील ३ वर्षांचा अनुभव विचारात घेऊन शेतकर्यांना खरीप हंगामाचे नियोजन करावे लागेल. शेतीतील अनिश्चितता दूर करण्यासाठी बहुपीक पद्धतीचा किंवा एकीकृत शेतीचा वापर, मिश्र पीक, आंतर पिकाचा वापर, निविष्ठा व शेती खर्चाची तरतूद करणे आवश्यक आहे. बियाणे खरेदी करताना प्रमाणित व खात्रीच्या बियाण्यांची खरेदी करावी, या बियाण्यांची घरी उगवणशक्ती तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार बियाण्यांचे प्रमाण ठरवून झाडांची प्रतिहेक्टरी योग्य संख्या ठेवावी लागणार आहे. या सर्व पद्धतीचा शेतकर्यांनी वापर केल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. ज्या शेतकर्यांनी समतल रेषेस समांतर किंवा उताराला आडवी पेरणी केली होती. त्यांना चांगला फायदा झाल्याचे अनेक शेतकर्यांनी सांगितले आहे. या वर्षी शेतकर्यांनी हा प्रयोग करावा. या पद्धतीने पेरणी केल्यास शेतातील पाणी वाहून न जाता वरंब्याला अडून शेतात मुरते. त्यामुळे पिकाला दिलेली खते वाहून जात नाहीत. येणार्या हंगामात निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड आणि कीड, रोगाविषयी जागरू क राहून त्याचे एकात्मिक व्यवस्थापन शिवार, गावपातळीवर सामूहिकरीत्या करणे आवश्यक असल्याचा सल्लाही कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना दिला आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असून, जलसंधारणाची कामे उरकवावी, उताराला आडवी पेरणी केल्यास त्याचा फायदा शेतकर्यांना मिळतो. वेळेवर पेरणी करणे गरजेचे आहे. -शेतीचे नियोजन करणे आवश्यक असून, शेतकर्यांनी समतल चर, उताराला आडवी पेरणी, असे प्रयोग केल्यास त्याचा उत्पादनात फायदा होतो.- डॉ. व्ही.एम. भाले,अधिष्ठाता कृषी, डॉ. पंदेकृवि, अकोला.
शेतक-यांनी बहुपीक शेती पद्धत वापरावी!
By admin | Published: May 06, 2017 2:43 AM