- संतोष येलकर
अकोला: मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वाटप करण्यात येत असलेल्या कर्जाच्या जाळ्यात राज्यातील शेतकरी व शेतमजूर अडकले असून, कर्ज वसुलीसाठी लागवण्यात येत असलेला तगादा आणि धमक्यांनी शेतकरी धास्तावले आहेत, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.राज्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकरी व शेतमजुरांना २० हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. शेती, ग्रामीण कृषी उद्योग, घर दुरुस्ती व बचतगटांचे सबळीकरणच्या नावावर फायनान्स कंपन्यांकडून कर्ज देण्यात आले आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जाचा व्याज दर १८ ते २४ टक्के असून, शेतकरी व शेतमजुरांना परवडणारा नाही; मात्र दुष्काळी परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जाच्या जाळ्यात शेतकरी व शेतमजूर अडकले आहेत. १८ ते २४ टक्के व्याज दराने फायनान्स कंपन्यांकडून कर्जाची वसुली करण्यात येत असून, त्यासाठी शेतकऱ्यांना धमकावून, कर्ज रकमेचा भरणा करण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या या तगाद्याने राज्यातील विविध भागात शेतकरी धास्तावले असून, गाव सोडून जात असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.संघटित सावकारीमुळे वाढल्या शेतकरी आत्महत्या!मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या संघटित सावकारीमुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या असून, मायक्रो फायनान्स कंपन्यांवर नियंत्रण आणण्याचे सूतोवाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केल्यानंतर, गत आठवड्यात अकोला जिल्ह्यात फायनान्स कंपनीच्या छळापायी एका शेतकºयाने आत्महत्या केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे, असे किशोर तिवारी यांनी सांगितले.जुलमी वसुली थांबवा; कर्ज वितरणावर बंदी आणा!ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकरी-शेतमजुरांना दिलेल्या कर्जाची वसुली ९ टक्क्यापेक्षा जास्त व्याज दराने करण्यात येऊ नये. तसेच फायनान्स कंपन्यांकडून होणारी जुलमी वसुली सरकाने तातडीने थांबवावी आणि फायनान्स कंपन्यांनी शेतकरी व शेतमजुरांना दिलेले कर्ज सरकारने माफ करावे व मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्ज वितरणावर बंदी आणावी, अशी मागणीही वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे.