अकोला : सोयाबीनची नापिकी आणि बँकेचे कर्ज या विवंचनेत शेतकर्याने शेतामध्ये फवारणीचे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच रविवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास शेतकर्याला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शेगाव तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी पुरुषोत्तम किसन कराळे (५५) यांना नापिकी झाली. त्यात बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत रविवारी दुपारी १.३0 वाजताच्या सुमारास टाकळी शिवारातील शेतातमध्ये विषारी औषध प्राशन करून कराळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली. सोयाबीनचे पिक झाले नाही. मुलाच्या शाळा-कॉलेजसाठी पैसा नाही, घर बांधायला पैसा नाही. कर्जापायी आत्महत्या करीत आहे, असे त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद आहे. त्यांनी कीटकनाशक प्राशन केल्याचे लक्षात येताच शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. पुरुषोत्तम कराळे यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. यावर्षी त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती; परंतु ते पिकले नाही. त्यांचा मुलगा दत्ता हा बी.ए. अंतिम वर्षाला शिकत असून, अकोल्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. त्याच्या शिक्षणाचा न झेपावणारा खर्च कसा भागवावा, स्टेट बँकेतून काढलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतूनच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
नापिकीमुळे शेतक-याचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: December 16, 2014 1:09 AM