सुलतानपूर, दि. ३- येथील अल्पभूधारक शेतकरी अशोक किसनराव सुरुसे (वय ५0) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. थकलेले बँकेचे कर्ज व मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. अशोक सुरुशे यांच्या मालकीची कोरडवाहू २ एकर शेती आहे. शेतीच्या भरवशावरच मुलीचे लग्न करावयाचे होते. त्यांनी शेतीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया सुलतानपूर शाखेचे ४0 हजार रुपये कर्ज घेतले होते. सोयाबीनचे पडलेले भाव यामुळे अशोक सुरुशे आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांना ४ मुली व १ मुलगा असून ३ मुलींचे लग्न झालेले आहेत. तर एका उपवर मुलीच्या लग्नाचा प्रश्न त्यांच्यासमोर होता. याच चिंतेने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे नातेवाइकांकडून सांगितल्या जात आहे. या घटनेची फिर्याद गणेश नारायण सुरुशे यांनी मेहकर पोस्टेला दिली. त्यावरून पोकॉ आढाव, रहाणे, जाधव, सानप हे पुढील तपास करीत आहेत.
आर्थिक विवंचनेतून शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: November 04, 2016 2:12 AM