आगरसह परिसरातील अनेक गावातील शेती खारपाणपट्ट्यात असल्याने शेतकरी कपाशी, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांची लागवड करतो. मागील चार, पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीमुळे आणि वन्य प्राण्यांच्या धुडगूसामुळे सर्वच पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कोणत्याही पिकाचे उत्पन्न हाती लागत नाही. अशातच कृषी विभाग यांच्याकडून शेतकऱ्यांच्या हिताच्या शासकीय योजनांची माहिती मिळत असल्याने शेतकरी योजनांकडे आकर्षित होत आहेत. येथील शेतकऱ्यांनी गट शेती करण्याचा संकल्प करून कृषी विभागामार्फत कुक्कुपालन तर काही शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. शेतात शेततलाव व वीज पुरवठा घेऊन माजी सरपंच सतीश काळणे यांनी रेशीम उद्योगासाठी शेतात तुती लागवड करून रेशीम कोषाचे उत्पन्न घेतले आहे. रवींद्र दयाराम काळणे, दयाराम महादेव काळणे, कविता कुकडे यांनी कुक्कुटपालनाकरिता टिन शेड उभारून व्यवसाय सुरू केला आहे. या शेतकऱ्यांचा प्रयोग परिसरात यशस्वी ठरत असल्याने अनेक शेतकरी पारंपरिक शेतीसोबतच जोडधंद्याकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.
फोटाे: