यावर्षी पावसाच्या अनियमितेमुळे गतवर्षीच्या तुलनेत कडधान्याचे क्षेत्र पट्ट्यात घटणार असणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामास प्रारंभ होताच पाऊस समाधानकारक होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच पेरणीला प्रारंभ केला होता. यावर्षी मात्र महागाडे बियाणे, रासायनिक खते घेऊन वेळप्रसंगी खासगी कर्ज काढून शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे उगवलेले पीक कोमजले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. खारपाणपट्ट्यात पिकांना पाणी देण्यासाठी कोणत्याच प्रकारची सिंचन सुविधा नाही. त्यामुळे शेतकरी निसर्गाच्या भरवशावरच आहे.
चारा टंचाईचे सावट
शेतकऱ्यांच्या घरातील चारा संपला आहे. त्यामुळे चारा टंचाईचे सावट आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी जनावरांसाठी शेतकऱ्याने चाऱ्याचे नियोजन केले होते. मात्र, महिना समजूनही पुरेसा पाऊस पडल्यामुळे चाऱ्यांची टंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्याचे चाऱ्यांचे नियोजन कोलमडल्याने शासनाने सर्वेक्षण करून गुराढोरांच्या चाऱ्याची सोय करावी व शेतकऱ्याला दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.
शेतमजूर घरात, कामेच नाहीत!
शेतमजुरांना शेतात कामे नसल्याने मजूर घरीच बसला आहे. युवक वर्ग गावात कामे नसल्याने कामासाठी शहराकडे जात आहे. मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे.
कपाशीची पेरणी केली. दुसऱ्या दिवसापासून अचानक पावसाने दांडी मारल्याने कपाशीची झाडे कोमेजत आहेत. पाऊस आला नाही तर दुबारपेरणी करावी लागणार आहे. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना बियाणे, खते मोफत द्यावी. -भास्कर जगन्नाथ झामरे, शेतकरी रोहनखेड