कारंजा : तालुक्यातील मनभा येथे पिकाची रखवाली करण्यासाठी गेलेल्या शेतकरी बाप-लेकास जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार रविवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास उघडकीस आला. सोन्याची अंगठी व चेनसह रोख रक्कम हिसकावत पिता-पुत्राचे हातपाय बांधून त्यांना दुचाकीसह विहिरीत टाकले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात जुजबी उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयांत हलविण्यात आल्याची माहिती आहे. पोलीस पाटील दिलीप देशमुख यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मनभा येथील शेतकरी बाळकृष्ण मोतीराम सिरसोले (६५) यांच्या मनभा शिवारातील शेतात हरभरा पिकाची पेरणी करण्यात आली. या पिकाची राखण करण्यासाठी बाळकृष्ण सिरसोले आणि त्यांचा मुलगा दीपक (३६) हे गत १५ दिवसांपासून शेतात रात्री जागरण करीत आहेत. नेहमीप्रमाणे हे दोघे रविवारी सायंकाळी शेतात रखवालीसाठी गेले. थोड्याच वेळात अज्ञात ८ ते १0 इसम त्यांच्या शेतात आले. या इसमांनी बाळकृष्ण सिरसोले आणि दीपक यास मारहाण करीत त्यांच्याकडील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच १0 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि रोख रक्कम हिसकावली. एवढय़ावरच ते थांबले नाही, तर त्यांनी या दोघांचे हातपाय बांधून त्यांना शेतातील विहिरीत टाकले तसेच त्यांची दुचाकीही विहिरीत टाकली. त्यानंतर त्यांनी तेथून पलायन केले. विहिरीत साधारण चार ते पाच फूट पाणी होते.
शेतकरी बाप-लेकास जिवे मारण्याचा प्रयत्न
By admin | Published: December 07, 2015 2:46 AM