सुगंधी तेल निर्मितीवर भर; प्रशिक्षणासाठी कृषी विद्यापीठात उभारले आसवन संयंत्रअकोला: मसाले शेतीनंतर विदर्भात सुगंधी औषधी वनस्पतीच्या व्यावसायिक शेतीवर भर देण्यात येत असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन औषधी वनस्पती उद्यान विभागाने शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी सुगंधी तेल निर्मिती आसवन संयंत्र उभारण्यात आले आहे.केंद्र शासनाच्या ३६५ दिवस औषधी वनस्पती प्रचार व प्रसार कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या अर्थसहाय्यातून नागार्जुन औषधी वनस्पती उद्यानात शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेत औषधी व सुगंधी वनस्पती लगवडीशी संबंधित सर्व भागधारकांना एकत्रित बोलावून त्यांना लागवड वाढविण्यासंबंधी तसेच पूरक बाजारपेठ उपलब्ध करू न देण्याच्या विविध धोरणांवर सखोल चर्चा करण्यात येत आहे. औषधी सुगंधी वनस्पतीवरील प्रक्रियेसाठी ग्रामीण स्तरावर तेलनिर्मिती संयत्रे गट समूहाने उभारण्यावर भर देण्यात येत आहे. अशी यंत्रे उभारून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यावर भर देण्यात येत आहे. हे तेल आसवन संयंत्र येथे केंद्र शासनाच्या सीआयएमएपी लखनऊ या संस्थेच्या सहकार्याने उभारण्यात आले आहे. नागार्जुन वनस्पती उद्यानात बुधवारी सुगंधी तेल आसवन संयंत्राचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी. दाणी यांनी केले. दरम्यान, पारंपरिक शेतीसोबतच विदर्भातील शेतकरी मसाले, सुगंधी औषधी वनस्पतीसारख्या व्यावसायिक शेतीची कास धरीत आहे. शेतकरी तिखाडी गवताची लागवड करीत असून, तिखाडी तेल निर्मितीचा प्रकल्प उभारत आहेत. काही शेतकऱ्यांनी माईनमुळा (कोलिअस) या औषधी वनस्पतीची शेती सुरू केली आहे. तथापि, या शेतीला व्यापक स्वरू प देण्यासाठी कृषी विद्यापीठाने मोहीम हाती घेतली असून, शेतकऱ्यांनी सुगंधी वनस्पतीची व्यावसायिक लागवड करावी, यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. वनस्पती औषधी शेतीच्या प्रसारासाठी नागार्जुन वनस्पती उद्यानात सुगंधी औषधी वनस्पतीची रोपे व बियाणे शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आली आहेत. यात कोरफड, शतावारी करंज, बिहाडा, गुग्गुळ, अडुळसा, पानफुटी, निरगुडी, सुगंधी गवत, तिखाडी, खस (वाळा), ही रोपे तर कौचा, अश्वगंधा, अक्कलकारा, बिक्झा इत्यादींच्या बियाण्यांचा समावेश आहे.शेतकऱ्यांनी औषधी वनस्पतीची लागवड करावी, यासाठी प्रचार व प्रसार करण्यात येत असून, सुगंधी तेल निर्मिती उद्योग उभारावेत याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. याकरिता येथे सुगंधी तेल आसवन संयंत्र उभारण्यात आले आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण,प्रात्यक्षिकासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.डॉ. संजय वानखडे, सहयोगी संशोधन संचालक, डॉ. पंदेकृवि,अकोला.
विदर्भातील शेतकऱ्यांना उद्योजकतेचे धडे!
By admin | Published: April 07, 2017 10:55 PM