अकोट : अकोट तालुक्यात पेरणीयोग्य सरासरी पाऊस पडला नाही, जून महिना उलटून गेल्यावरही हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्यात मोसमी वाऱ्यासह पाऊस सक्रिय होणार, गतवर्षीच्या सरासरीपेक्षा पाऊस जास्त प्रमाणात पडणार, असा अंदाज फेल गेला. मृग नक्षत्र समाप्त होऊन आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा असून, वेळेवर पाऊस न झाल्यास यंदा उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
खारपानपट्ट्यातील शेती निसर्गाच्या पाण्यावरच अंवलबून असते. यावर्षी हवामान विभागाच्या अंदाजानुसार दमदार पाऊस पडला नसल्यामुळे परिसरामध्ये शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. त्यामुळे पेरण्या लांबल्या आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच मशागतीची कामे उरकून घेतली आहेत. परिसरामध्ये पाऊस कमी प्रमाणात असल्यामुळे खरीप हंगामातील इतर पिकांची पेरणी थांबली आहे. आता हवामान अंदाजानुसार सांगितलेला पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकरी चिंतित आहेत. पावसाअभावी पेरणी लांबली असून, याचा फटका उत्पादनावर बसणार असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांनी बी-बियाणाची खरेदी करून तयार आहेत.
----------------------
आर्द्रातही पेरणीला सुरुवात नाही!
शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असून, यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाच्या अंदाजानुसार अंदाज दिला होता; परंतु हवामानाच्या अंदाजानुसार पाऊस न आल्यामुळे परिसरामधील पेरणी लांबली आहे. मृग नक्षत्रामध्ये होणारी पेरणी आता आर्दा लागल्या तरी पेरणीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद, कपाशीसारख्या पिकांचे उत्पादन घटल्यास आर्थिक बजेट बिघडणार आहे.