गर्दी टाळण्यासाठी उपाययोजनांचा अभाव
अकोला : शहरातील विविध बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यासह सॅनिटायझरची व्यवस्थाही राहत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
एटीएममध्ये डिस्टन्सिंगचा फज्जा
अकोला : शहरातील विविध बँकिंग कंपन्यांच्या एटीएममध्ये व्यवहार करताना ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राखले जात नसल्याची बाब समोर येत आहे. अनेक एटीएम सेंटरमध्ये एकावेळी दोन ते तीन ग्राहक प्रवेश करीत असल्याने संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. अशा ठिकाणी सुरक्षा रक्षकही राहत नसल्याने बेजबाबदारीने वागणाऱ्यांवर कोणताही वचक दिसून येत आहे.
बालकांचे लसीकरण केव्हा
अकोला : सर्दी, खोकला, तापासारखी लक्षणे असणाऱ्या बालकांच्या कोविड चाचण्यांकडे पालक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. बाधित रुग्ण असलेल्या अनेक घरांतील बालकांमध्ये कोविडची लक्षणे दिसून येत आहेत. बालकांवर लक्षणे आधारित उपचार करण्यात येतात. गंभीर लक्षणे नसल्याने बालक लवकर बरे होतात, असे बालरोग तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.
असुरक्षितरीत्या मास्कची विक्री
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कची मागणी वाढली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत खुल्या मास्कची असुरक्षितरीत्या विक्री केली जात आहे. हा प्रकार कोरोनाला निमंत्रण देणारा ठरू शकतो. मास्क विक्रीसाठीही काही नियम लावण्याची गरज आहे.
वाहतुकीची कोंडी
अकोला : नवीन कापड बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरच वाहनांची वर्दळ वाढल्याने या मार्गावर शुक्रवारी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. हाच प्रकार जैन मंदिर परिसरातही झाल्याचे दिसून आले. गर्दी वाढत असल्याने पुन्हा कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आधार केंद्रांवर वाढली गर्दी
अकोला : कोरोनाच्या निर्बंधांमुळे सुमारे दोन महिन्यांपासून आधार केंद्र बंद होते. मात्र, जून महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने आधार केंद्रही पूर्ववत सुरू झाले. आधार दुरुस्तीसाठी अनेक जण आधार केंद्रांवर गर्दी करीत असल्याचे चित्र गत चार दिवसांपासून दिसू लागले आहे.