- अतुल जयस्वाल
अकोला : गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे असल्याने प्रमुख अन्नधान्यापैकी एक असलेल्या ज्वारीचा पेरा दरवर्षी घटत आहे. खरीप हंगामातील ज्वारी पेरणीकडे पाठ केल्याने अन्नदात्या शेतकऱ्यांवरच आता ज्वारी विकत घेऊन खावी लागण्याची वेळ येऊ शकते.
जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी ज्वारी हे प्रमुख पीक होते. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी ज्वारीची पेरणी करत. वर्षभर लागणारे धान्य व गुरांना वैरण असा दुहेरी उद्देश ज्वारीच्या पेरणीतून साध्य होत होता. ज्वारीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होत असल्याने वर्षभर अन्नधान्याची ददात नसायची. तथापी, गत काही वर्षांपासून सोयाबीन, कापूस, तूरसारखी नगदी व जास्त प्रमाणात उत्पन्न देणारी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शिवाय वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळूनही शेतकऱ्यांनी ज्वारीचा पेरा कमी केला आहे.
शेतकऱ्यांना हवे अधिक उत्पन्न देणारे पीक
शेती व्यवसायाला आता तंंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने आधुनिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अधिकाधिक उत्पन्न देणारे पीक शेतकऱ्यांना हवे आहे. यासाठी खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, उडीद यासारखी पिके घेतली जात आहेत. या पिकांना बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे ज्वारीकडे दुर्लक्ष होत आहे.
असा घटला ज्वारीचा पेरा
वर्ष पेरा (हेक्टर)
१९१८ - ८२४०
२०१९ - ७९५०
२०२० - ७५५७
२०२१ - ७०५२
यंदा कोणत्या पिकाचा किती पेरा ?
पीक पेरा (हेक्टर)
ज्वारी - ७०५२
तूर - ५५१०४
कापूस - १४०५४७
सोयाबीन - २३०२२५
मूग - २२२७५
उडीद - १४७५५
ज्वारीच्या उत्पादनात घट येत असल्याने ते खर्चाला परवडणारे पीक नाही. याशिवाय रानडुकरांच्या हैदोसामुळेही ज्वारीचे पीक घेणे बंद केले आहे. त्याऐवजी आता कापूस, सोयाबीन यासारखी पिके घेत आहोत.
- विश्वास तेलगोटे, शेतकरी, नवथळ
सोयाबीन, कापूस या पिकांना बाजारात चांगला भाव मिळतो. ज्वारीला मात्र तेवढा भाव मिळत नसल्याने पेरा कमी झाला आहे. वर्षभराचे धान्य व गुरांचे वैरणासाठी मात्र दरवर्षी थोड्या प्रमाणात ज्वारी पेरतो.
- दिगंबर वक्टे, शेतकरी, पाळोदी