व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा संदेश देणारा दिवस असून तो सर्वत्र साजरा होतो. आम्ही शेतकरी पुत्रांनी सहा-सात वर्षांपूर्वी शेतकरी जागर मंचाची स्थापना केली व सातत्याने शेतीशी संबंधित प्रश्न सरकारदरबारी मांडले व सोडविले. आज नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांमुळे शेती अडचणीत आली आहे. अशा परिस्थितीत सरकारने आमच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव व आमचे उत्पन्न दुप्पट करण्याचे घोषित केले. सरकारने उरफाटा न्याय केला व दीडपट दुप्पटचे गणित बिघडविले. कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने ५ जून रोजी शेतकरीविरोधी तीन काळे कायदे पारित केले आणि शेतकरी पुत्रांच्या उरल्यासुरल्या आशा धुळीस मिळवल्या. त्यामुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आला असून आमचे पहिले प्रेम असलेली शेती आणि शेतकरी मायबाप यांना वाचविण्यासाठी ‘सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंटाईन’ हे अनोखे आंदोलन हाती घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावर हे आंदोलन होणार असून चार चौकात नागरिकांना ग्रीटिंग कार्ड आणि गुलाबपुष्प देण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन आपले प्रेम वाचविण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेले शेतकरीविरोधी तीन कायदे परत घेण्यासाठी विनंती करणार आहोत, असे यावेळी सांगण्यात आले. शेतकरी विरोधी कायद्याविरोधात संवैधानिक पध्दतीने प्रयत्न करीत असतानाही प्रधानसेवकांनी आंदोलकांना आंदोलनजीवी ठरविले व आमच्या मायबापांना नक्षलवादी. मात्र आम्ही प्रेमाचा मार्ग सोडणार नाही. त्यामुळे या आंदोलनात अधिकाधिक संख्येने शेतकऱ्यांच्या मुलामुलींनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेला शेतकरी जागर मंचाचे संयोजक प्रशांत गावंडे, कपिल ढोके, आकाश पवार, श्याम मनतकार, अक्षय राऊत, अंकुश गावंडे, सौरव गवई, अमोल इंगोले, पवन मंगळे, प्रतीक सुरवाडे, रेहानभाई, आकाश कवळे, कुणाल शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
शेतकरी जागर मंच करणार ‘सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंटाईन’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:17 AM