लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्यांची हजारो क्विंटल तूर विकल्या गेली नाही. पैसे मिळाले नाहीत. कर्जमाफी दिली, त्यात अनेक जाचक अटी लादल्या. कापूस उत्पादक शेतकर्याला एकरी २0 हजार रुपये खर्च येतो. शेतमालाला भाव मिळत नाही. भारत कृषिप्रधान देश असूनही सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. केंद्र व राज्य शासन शेतकर्यांची चेष्टा करीत आहे. शेतकर्यांसंदर्भात मी खोटे बोलत असेल, तर सरकारला माझे खुले आव्हान आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असा आरोप करीत शेतकर्यांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी भूमिका भाजपाचे खासदार नानाभाऊ पटोले यांनी त्यांच्याच सरकारच्या विरोधात घेतली आहे.शेतकरी जागर मंचातर्फे रविवारी दुपारी खंडेलवाल भवनात आयोजित शेतकरी संवाद सभेत ते बोलत होते. मंचावर शेतकरी जागर मंचाचे जगदीश मुरूमकार, प्रशांत गावंडे, कृष्णा अंधारे, महादेवराव भुईभार, डॉ. हर्षवर्धन मालोकार, ज्ञानेश्वर सुलताने, मनोज तायडे, शेतकरी संघटनेचे अविनाश नाकट, धनंजय मिश्रा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जि.प. माजी उपाध्यक्ष गजानन पुंडकर, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, शेकापचे प्रदीप देशमुख, काँग्रेसचे नगरसेवक डॉ. झिशान हुसैन, ज्ञानेश्वर गावंडे, नंदकिशोर टेके, डॉ. कृष्णमुरारी शर्मा, जि.प. सदस्य सम्राट डोंगरदिवे, टिना देशमुख, सय्यद बाशिद, अन्सार शेख आदी उपस्थित होते. खा. पटोले बोलताना म्हणाले, केंद्र व राज्य शासनाने शेतकर्यांच्या कोणत्याही समस्या सोडविल्या नाहीत. शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून शेतकरी, जनतेच्या समस्या शासनदरबारी मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेसुद्धा शेतकर्यांच्या समस्या मांडल्या. शेतकरी आणि शेतीचा विकास करायचा असेल, तर केंद्र शासनाने शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडायला हवा, इंग्लंडसारख्या देशाची ८५ टक्के भागीदारी शेतीत आहे. हे धोरण केंद्राने स्वीकारायला हवे, शेतमालाचे सर्मथनमूल्य वाढवावे. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, कर्जमाफीच्या अर्जात लादलेल्या जाचक अटी मागे घेऊन शेतकर्यांचा सात-बारा कोरा करावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकर्यांनी जात, धर्म बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन खा. पटोले यांनी केले. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्याची दखल शासन घेत नाही, त्यामुळे आता सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही खा. पटोले यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन शिवाजी म्हैसने यांनी केले.
जातीय राजकारणातून बाहेर पडून एकजूट व्हा!राज्यात अकोला जिल्हा जातीय राजकारणासाठी ओळखल्या जातो. जातीय मतांचे अकोल्यात मोठे प्राबल्य आहे. आता शेतकरी समस्यांच्या मुद्यांवर ते बाजूला सारा, जातीव्यवस्थेच्या राजकारणातून बाहेर पडा, एकजूट व्हा. जात, धर्माला महत्त्व न देता खरा लोकांचा प्रतिनिधी तयार करा, असे आवाहनही खासदार नाना पटोले यांनी शेतकरी संवाद सभेत केले.
राज्य व केंद्रातील कृषी मंत्री नावालाच!शेतकर्यांसमोर समस्या वाढत आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. निसर्ग साथ देत नाही. अशा परिस्थितीत कृषी मंत्र्यांनी सक्रिय असायला हवे. शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करायला हवा; परंतु राज्य व केंद्रातील दोन्हीही कृषी मंत्री केवळ नावालाच आहेत, असा आरोपही खा. पटोले यांनी केला.