अकोला: अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील विविध भागात जमीन खरडून गेली असून, पिके पाण्यात बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला. शेतातील पिके वाहून गेल्याने, पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे. शेती आणि पिकांच्या नुकसानाचे पंचनामे प्रशासनामार्फत सुरु करण्यात आले असले तरी, नुकसान भरपाईची मदत केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या पाहणीदरम्यान समोर आले आहे.
जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बरसला असून, त्यामुळे जिल्ह्यातील नदी आणि नाल्यांना पूर आला होता. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात शेतातील पिके पाण्याखाली गेली. नदी व नाल्याकाठासह शेतातील पाटांना आलेल्या पुराने शेतजमीन खरडून गेली. तसेच काही ठिकाणी पिके वाहून गेली तर काही ठिकाणी शेतात साचलेल्या पाण्यात पिके बुडाली. अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात मूृग, उडीद, कपाशी, सोयाबीन, तूर इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च पाण्यात गेल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. नदी व नाल्याचे पूर ओसरल्यानंतर पिकांच्या नुकसानाचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आले असून, पीक नुकसान भरपाईची मदत शासनाकडून केव्हा आणि किती मिळणार, याबाबतची प्रतीक्षा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
नफ्याने केलेल्या शेतातील
मुगाचे पीक गेले वाहून!
पाच एकर नफ्याने केलेल्या शेतात मूग पेरणी केल्यानंतर अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात शेतातील पाटाच्या पुरात एक एकर मुगाचे पीक वाहून गेले. तसेच शेतात पावसाचे पाणी साचल्याने शेतातील मुगाचे उभे पीक सडत आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले असून, लागवडीसाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे, अशी व्यथा घुसर येथील शेतकरी डिगांबर रामचंद्र कांगटे यांनी मांंडली.
.....................फोटो.......................
लोणार नाल्याकाठची जमीन
खरडली; पिके वाहून गेली!
आपोती आणि आपातापा गावामधून वाहणाऱ्या लोणार नाल्याला आलेल्या पुरात नाल्याकाठची जमीन खरडली असून, शेतातील पिके पाण्याखाली गेली. तसेच अनेक शेतातील पिके नाल्याच्या पुरात वाहून गेली. कपाशी, मूग, तूर इत्यादी पिके पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
......................फोटो................
ठोक्याने केलेल्या शेतातील
कपाशीचे पीक बुडाले !
२५ हजार रुपयांत ठाेक्याने केलेल्या दोन एकर शेतातील कपाशीचे पीक अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात बुडाले. लागवडीसाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे. तसेच स्वत:च्या दोन एकर शेतातील एक एकर कपाशीचे पीक पाटाच्या पुरात वाहून गेले. त्यामुळे सरकारने पीक नुकसानाची मदत तातडीने दिली पाहिजे, अशी व्यथा आपातापा येथील शेतकरी रामदास राधाकिसन बोपटे यांनी मांडली.
..................फोटो..........................