काेराेनाच्या भीषण संकटात मध्यवर्ती कारागृहात असलेली कैद्यांची भरमसाट संख्या कमी करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरूनच हालचाली झाल्या हाेत्या. त्यामुळे अकाेला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील तब्बल ४० पेक्षा अधिक कैद्यांना पॅराेलवर जामीन देण्यात आला हाेता. त्यामुळे काही प्रमाणात संख्या कमी झाली़, तर रेल्वे स्टेशन परिसरात उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहातही कैद्यांना ठेवण्यात आल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या ४५७ कैद्यांचे सामाजिक अंतर पाळण्यास मदत झाली़. याच काळाच्यापूर्वी मध्यवर्ती कारागृहात असलेल्या मशिनरीज अमरावती येथे पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या शेती कसणे व शासनाने ठरवून दिलेली इतर कामे करण्यात येत आहेत. काेराेना काळात मास्कही बनवल्याची माहिती आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययाेजना करण्यात आलेल्या आहेत. तसेच काेराेनाचा धाेका हाेऊ नये म्हणून बाहेरील व्यक्तींना आतमध्ये प्रवेश देण्यात येत नसल्याची माहिती आहे.
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एकूण कैदी - ४५७
पॅराेलवर बाहेर असलेले कैदी - ४१
गंभीर गुन्ह्यातील कैदी - १४७
काय बनविले जाते...
लाकडापासून बनविलेल्या विविध कलाकृती असलेले साहित्य, लाेकरीचे ब्लॅंकेट, सुती कापड यासह विविध वस्तू अकाेला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बनविण्यात येत हाेत्या. मात्र मागील काही काळापासून हे बंद झाले आहे. तसेच हे साहित्य बनविण्यासाठी असलेली यंत्रसामग्री अमरावती येथील कारागृहात हलविण्यात आली आहे. त्यामुळे अकाेला कारागृहातील कैद्यांकडून शेती व इतर कामे करून घेण्यात येतात.
पॅराेलला पसंती
अकाेला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैद्यांची पॅराेलला पसंती आहे. पॅराेलवर जामीन घेऊन बाहेर येण्यासाठी कैद्यांची चढाओढ असते. मात्र यामधील सत्य कारण असलेल्यांनाच पॅराेलवर जामीन देण्यात आला आहे. इतरांना मात्र त्यांची कारणे बघता, जामीन नाकारण्यात आला आहे.
काेराेना काळात शेती कसली
जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी काेराेना काळात यंत्रसामग्री नसल्याने शेती कसल्याची माहिती आहे, तर अनेक कैद्यांना काेराेना झाल्यामुळे त्यांना विलगीकरण करून आराम देण्यात आला. मध्यवर्ती कारागृहातील तब्बल १५२ जणांना काेराेनाची लागण झाली हाेती. मात्र आता कारागृह काेराेनामुक्त बनले आहे.
कारागृहातील कैद्यांना वरिष्ठ स्तरावरून असलेल्या आदेशानुसार कामे देण्यात येतात. काेराेना काळापासून कामे कमी झाली असली तरी त्यांच्याकडून शेतीतील कामे करून घेण्यात येत आहेत. भाजीपाला पिकविण्याचे कामही आता कैद्यांकडून करण्यात येत आहे. काेराेनामुळे त्यांची वारंवार आराेग्य तपासणीही करण्यात येते.
- सुभाष निर्मळ
अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, अकाेला़