अकोला: सन २०१९ मध्ये झालेल्या सरळ सेवा भरतीमध्ये राज्य परिवहन विभागामार्फत रिक्त जागांवर पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यानंतर त्या पात्र उमेदवारांना चालक तथा वाहक पदाचे प्रशिक्षणही देण्यात आले. मात्र गत चार महिन्यांपासून त्यांना नियुक्ती देण्यात आली नसल्याने पात्र उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. २८ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनानुसार, राज्य परिवहन विभागाने चालक तथा वाहकाच्या रिक्त पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवून पात्र उमेदवारांची निवड केली होती. पात्र उमेदवारांनी सर्व नियमांची पुर्तता करून प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला चालक पदासाठी तर नोव्हेंबर २०२२ मध्ये वाहक पदासाठी प्रशिक्षण घेतले.
राज्यभरात विविध जिल्ह्य्यांमध्ये राबविलेल्या भरती प्रक्रियेंतर्गत इतर जिल्ह्यांमध्ये चालक तथा वाहक पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली, परंतू अकोला जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना अद्यापही नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे सरळ सेवा भरती -२०१९ अंतर्गत पात्र उमेदवार चालक तथा वाहक यांना राज्य परिवहन महामंडळ अकोला विभागात नियुक्त देण्यात यावी, अशी मागणी करीत नियुक्ती न मिळालेल्या पात्र चालक तथा वाहक उमेदवारांनी २८ फेब्रुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी पात्र उमेदवारांनी रा.प. महामंडळ अकोल्याचे विभाग नियंत्रक, जिल्हाधिकारी, पालकमंत्री आदींना निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहेत. उपोषणादरम्यान उमेदवारांचे नुकसान अथवा जीवित हानी झाल्यास रा.प. महामंडळ अकोला विभाग सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशाराही पात्र उमेदावारांनी निवेदनातून देण्यात आला आहे.
उपोषणामध्ये यांचा सहभाग
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणामध्ये सुबोध तायडे, संदीप बुध, दिनेश चव्हाण, सागर डोंगरे, चंदन भगत, राहूल वडतकार, नीखील झटाले, महेंद्र आढे, रवींद्र दहात्रे, राहूल साबळे, किशोर बेटकर, पंकज शिंद, नीलेश चौधरी, अजय सोनोने, रोहीत इंगळे, सचीन मनवर, संघपाल भगत, चेतन तेलगोटे, महादेव धनगर लक्ष्मण कराळ, उमेश पवार, अंकुश बुंदे, चेतन तेलगोटे आदींचा सहभाग आहे.