लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आपसात असलेल्या वादातून चार ते पाच जणांनी मिळून कुख्यात गुंड विकास ऊर्फ विक्की अशोक खपाटे (३२) याच्यावर कुऱ्हाड व लोखंडी पाइपने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. परिसरातील युवकांनी त्याला खासगी रुग्णालयात भरती केले; परंतु त्यापूर्वीच विक्कीचा मृत्यू झाला. ही घटना हरिहरपेठेतील गाडगेनगरात सोमवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. जुने शहर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.हरिहरपेठेतील गाडगेनगरात राहणारा विकास खपाटे हा गुंडप्रवृत्तीचा असून, त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षांपूर्वी दुर्गोत्सवादरम्यान त्याने एका वैयक्तीक वादातून योगेश चव्हाण नामक युवकाची हत्या केली होती. या हत्या प्रकरणातून साक्षी, पुराव्याअभावी त्याची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. विकास ऊर्फ विक्की खपाटे हा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करीत होता. सोमवारी दुपारी विकास खपाटे हा गाडगेनगरातील सार्वजनिक शौचालयामध्ये आला होता. शौचालयातून बाहेर आल्यावर त्याच्यावर संशयित आरोपी चेतन साहू, करण साहू, नितीन साहू आणि राजू काटोले यांनी धारदार कुऱ्हाड व लोखंडी पाइपने अचानक हल्ला चढविला. विकास शरीरयष्टीने मजबूत होता; मात्र, आरोपींनी त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने तो जागेवरच कोसळला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून येताच, आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. परिसरातील काही युवकांनी जखमी अवस्थेतच विकासला खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जुने शहरचे ठाणेदार गणेश अणे ताफ्यासह घटनास्थळावर पोहोचले. विकास खपाटे याची आई सुशिला खपाटे हिने चेतन साहू, करण साहू, नितीन साहू आणि राजू काटोले यांनी माझ्या मुलाची हत्या केल्याचा आरोप केला. घटनास्थळाला अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस अधीक्षक उमेश माने पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आणि पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आरोपींच्य शोधार्थ दोन पोलीस पथक रवाना झाले आहे. परिसरातील नागरिक भयभीतविकास खपाटे हत्याकांडामुळे गाडगेनगर परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांसोबत, प्रत्यक्षदर्शीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला; परंतु एकाही नागरिकाने पोलिसांना माहिती दिली नाही. सर्वांनीच आम्हाला काहीच माहिती नाही. असे पोलिसांना सांगितले. भरवस्तीमध्ये ही घटना घडल्यावर अनेकांनी हल्ला पाहिला; परंतु एकही जण पुढे यायला तयार नाही. आरोपी हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्यामुळे नागरिक घाबरत असावेत असे पोलिस सुत्रांनी सांगीतले.नियोजनपूर्वक केली हत्यापोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, आरोपींनी कोणताच पुरावा या ठिकाणी सोडला नाही. हत्यार, आरोपीच्या चपलासुद्धा घटनास्थळावर दिसून आल्या नाहीत. आरोपींनी अत्यंत शांत डोक्याने आणि नियोजनपूर्वक विकास खपाटे याची हत्या केल्याचे दिसून येत आहे. आरोपी आणि मृतक हे गुन्हेगार वृत्तीचे आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीही करतात अवैध सावकारीचा व्यवसाय मृतक विकास खपाटे हा अवैध सावकारीचा व्यवसाय करायचा. त्याचबरोबर आरोपी चेतन साहू, करण साहू, नितीन साहू हे सुद्धा लोकांना व्याजाने पैसे देतात. गत काही महिन्यांपासून खपाटे व साहू बंधूमध्ये वाद सुरू होते. या वादातूनच आरोपींनी त्याची निर्घृण हत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. श्वान पथकही फिरले माघारीघटना घडल्यानंतर पोलीस श्वानाला पाचारण करण्यात आले होते; परंतु घटनास्थळावर एकही सुगावा नसल्यामुळे पोलीस श्वानसुद्धा घुटमळत राहिले.
कुख्यात गुंडाची भरदिवसा निर्घृण हत्या!
By admin | Published: June 27, 2017 9:57 AM