- मनोज भिवगडे
अकोला : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपच्या विरोधात शुक्रवार, दि. २१ जून रोजी सकाळी ११ वाजता चिखलफेक आंदोलन करण्यात आले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, रोजगाराचे प्रश्न, सरकारचा भ्रष्टाचार आदी विषयांचा निषेध नोंदवित ह आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपत्री राजश्री शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम महाराष्ट्रातील युती सरकारने केले असल्याचा आरोप करीत हे चिखलफेक आंदोलन करण्यात आले.
सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली आरक्षणाचे वाद निर्माण करून जाती-जातीत भांडणे लावत राज्यातील सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न सरकारने चालविला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मागील दहा वर्षांपासून केंद्रातील भाजप सरकारने महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला खीळ घातली असून, राज्यातील मोठे उद्योग गुजरातला पळविण्यात येत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. सरकारी नोकर भरती केली जात नाही. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाही. या परीक्षा घेतल्या तर पेपर फुटीचे ग्रहण लागते. नीट परीक्षेच्या पेपर फुटी व निकालातील घोळाने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे. राज्यातील पोलिस भरती चिखलात सुरू आहे. यामुळे उमेदवारांचे नुकसान होत आहे.
सरकार रिक्त पदे भरण्याबाबत कोणत्याही उपाययोजना करीत नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न गंभीर होताना दिसत असून, राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महिला, युवतींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहे. राज्यातील शेतकरी भयंकर संकटात आहे, पण त्यांना मदत दिली जात नाही. कांदा, कापूस, सोयाबीन असा कोणत्याही शेतमालाला भाव नाही. सरकार एमएसपी देत नाही. कठीण काळात जनतेला मदत करण्या ऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करीत आहे. राज्यात खते, बी-बियाण्यांचा काळाबाजार सुरू असून, कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवून केली जात आहे. सरकारच्या आशीर्वादाने श्रीमंतांची मुले गोरगरीब लोकांना गाड्याखाली चिडत असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या वतीने हे चिखलफेक आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक मानकर, महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, माजी राज्यमंत्री खान अजहर हुसेन, माजी आमदार बबनराव चौधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणी डॉ. अभय पाटील, सचिव प्रकाश तायडे, मदन भरगड, मनपाचे माजी विरोधी पक्ष नेता साजिद खान पठाण, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ, झिशान हुसेन, प्रवक्ते डॉ.सुधीर ढोणे, डॉ. सुभाष कोरपे, विवेक पारस्कर, महेश गणगणे, कपिल रावदेव, महेंद्र गवई, विजय देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पूजा काळे, पुष्पा देशमुख, भूषण गायकवाड, प्रमोद डोंगरे, महानगर काँग्रेस कमिटीचे निरीक्षक धनंजय देशमुख आदींसह काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.