- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: वडील या शब्दाची व्यापी आणि महती फार मोठी असते. आकाशाहून उंच आणि सागरापेक्षाही खोल अशी असते. आपल्या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी सतत कष्ट आणि विचार वडील करतात. मुलेसुद्धा वडिलांच्या मेहनतीला सफल करण्यासाठी झटत असतात. अकोल्यातही अशी पिता-पुत्राची जोडी आहे, ज्यांनी देशपातळीवर अकोल्याचे नावलौकिक केले. बॉक्सिंग खेळात वडील विजय गोटे यांच्या मार्गदर्शनात मुलगा विश्व गोटे आपले ‘विजयी विश्व’ निर्माण करीत आहे.४४ वर्षीय विजय वसंतराव गोटे यांनी बॉक्सिंग खेळाडू म्हणून १९९९ ला मुंबईला झालेल्या वेस्टर्न इंडिया बॉक्सिंग चॅम्पियनशिप गाजविली होती. सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात पंच परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे बॉक्सिंग पंच (रेफरी/जज) म्हणून २००८ पासून कारकिर्दीला सुरुवात केली. पारदर्शिता आणि प्रामाणिक स्वभाव या गुणांमुळे विजय गोटे यांनी अल्पावधीतच बॉक्सिंग पंच म्हणून देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली. सब-ज्युनिअर, ज्युनिअर, युथ, सीनिअर, सुपरकप, इंटर सर्व्हिसेस अशा प्रतिष्ठेच्या जवळपास सतरा-अठरा राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत विजय गोटे यांनी पंच म्हणून सर्वोत्तम कामगिरी बजाविली. गंगटोक, कोइम्बतुर, औरंगाबाद, कोलकाता, अकोला, मुंबई, काकीनाडा, शिलाँग, चंदीगड, विशाखापट्टणम, हैदराबाद, गुवाहाटी, बंगळुरू , हरिद्वार, रोहतक आदी ठिकाणच्या राष्ट्रीय स्पर्धेत गोटे यांनी पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. विजय गोटे बी. आर. हायस्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपली नोकरी सांभाळून बॉक्सिंगचे प्रशिक्षक आणि पंच म्हणून ते काम करतात.मुलगा विश्व गोटे यानेदेखील वडिलांच्या पावलावर पाऊल टाक ले. १५ वर्षीय विश्वने यंदा दहावीची परीक्षा ८२ टक्के गुणांनी उत्तीर्ण केली. होलीक्रॉस कॉन्व्हेंटचा विद्यार्थी विश्वने दहावीच्या वर्षातदेखील खेळ आणि अभ्यास याचा समन्वय साधत दोन्ही क्षेत्रात बाजी मारली. यावर्षी गोवा येथे झालेल्या ज्युनिअर वेस्ट झोन बॉक्सिंग चॅम्पियनशिप विश्वने जिंकली. विश्वने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. याचवर्षी मुंबईला झालेल्या आंतरशालेय राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत विश्वने रौप्यपदक मिळविले. २०१६ मध्ये दिव-दमण येथे झालेल्या सब-ज्युनिअर वेस्ट झोन बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्वने महाराष्ट्राला सुवर्णपदकाची कमाई करू न दिली होती. त्यापूर्वी कोल्हापूरला झालेल्या के.ओ. कप स्पर्धेत विश्वने रौप्यपदकासह मोस्ट चॅलेजिंग बॉक्सरचा खिताब पटकावला होता. नंदूरबार येथे झालेल्या चौदा वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय स्पर्धेतदेखील विश्वने रौप्यपदक मिळविले होते.