अकोला: अकोट तालुक्यातील देऊळगाव येथे चार एकर शेतीच्या वादातून मोठा भाऊ व त्याच्या मुलाने लहान भावाची कुऱ्हाडीने घाव घालून निर्गुण हत्या केल्याची घटना 24 जुलै रोजी उघडकीस आली. या प्रकरणात अकोट ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अकोट तालुक्यातील देऊळगाव येथे राहणाऱ्या अर्चना ज्ञानेश्वर गहले (40) यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या मृत सासऱ्याची चार एकर शेती असून या शेतीच्या वहीतीवरून त्यांचे जेठ सुरेश बापूराव गहले यांच्या सोबत वाद सुरू होता.
सुरेश गहले व त्यांचा मुलगा शुभम हे नेहमीच त्यांच्या पतीला जिवे मारण्याच्या धमक्या द्यायचे. 23 जुलै रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांचे पती ज्ञानेश्वर बापूराव गहले(50) हे फवारणीसाठी शेतात गेले होते. दरम्यान शेतीच्या वादातून आरोपी सुरेश गहले व त्यांचा मुलगा शुभम गहले यांनी ज्ञानेश्वर गहले(50) यांच्यावर कुऱ्हाडीने दोन्ही पाय हात व डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. घटनेची माहिती चुलत दीर अनिल गहले यांनी देतात, गहले कुटुंबीयांनी शेताकडे धाव घेतली असता, ज्ञानेश्वर गहले हे शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. त्यांना तातडीने अकोट व नंतर अकोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु 23 जुलै रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. अर्चना गहले यांच्या तक्रारीनुसार अकोट ग्रामीण पोलिसांनी सुरेश गहले व शुभम गहले यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान 302 (34) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
कौटुंबिक वाद असल्याने दिली नव्हती तक्रार
मोठा भाऊ सुरेश गहले व ज्ञानेश्वर गहले यांचे वडील बापूराव गहले यांचे गतवर्षी ऑगस्ट महिन्यात निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या चार एकर शेतीवरून दोन भावांमध्ये वाद सुरू झाले. ज्ञानेश्वर गहले हे वडिलोपार्जित शेतीची वहीती करीत असल्याने सुरेश गहले हा नेहमीच वाद घालून जीवे मारण्याची धमकी द्यायचा. परंतु कौटुंबिक वाद असल्याने ज्ञानेश्वर गहले यांनी या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार केली नाही. त्याचाच परिणाम आज त्यांच्या कुटुंबीयांना भोगाव लागला.