रिसोड : तालुक्यातील मोठेगाव येथील ६५ वर्षीय दत्तराव निंबाजी तिरके यांचा अपघाती मृत्यू नसून, संपत्तीच्या वादातून तीन मुलांनीच त्यांचा खून केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर येत आहे. गुरूवारी पोलिसांनी मृतकाच्या तीनही मुलांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. मोठेगाव रस्त्यावर २५ नोव्हेंबरला दत्तराव तिरके यांचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. याप्रकरणी घातपाताचा संशय आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. मृतकाच्या अंगावरील जखमा व वैद्यकीय अधिकार्यांच्या चर्चेनुसार ठाणेदार एम.ए. रउफ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिगंबर कांबळे यांनी तपास केला. मृतकाच्या मुलांची कसून चौकशी केली असता, खून केल्याची कबुली दिली. संपत्ती व शेतीच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. मुलांनी वडिलाला शेतामध्ये नेले आणि दारू पाजल्यानंतर रुमन्याने मारुन खून केला. वडील मृत पावल्याची खात्री पटल्यानंतर मृतदेह रस्त्यावर आणून टाकला. संपत्ती व शेतीच्या वादातून हा प्रकार घडल्याची कबुली मुलांनी दिल्याचे तपास अधिकार्यांनी सांगितले. याप्रकरणी फिर्यादी दिगंबर कांबळे यांच्या चौकशीनुसार तीन मुले रवी दत्तराव तिरके, किशोर दत्तराव तिरके, किशन दत्तराव तिरके यांच्या विरुद्ध भादंवि कलम ३0२, २0१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तिघांनाही अटक करण्यात आली.
मुलांनीच केला पित्याचा खून
By admin | Published: November 27, 2015 1:49 AM