अकोला - बोरगाव मंजु पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोतर्डी येथील एका इसमाने त्याच्या तीन मुलांची निर्दयतेने हत्या करून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. विष्णू दशरथ इंगळे असे या निर्दयी बापाचे नाव असून, तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती दिल्यानंतरही बोरगाव मंजु पोलीस तब्बल दोन ते अडीच तास घटनास्थळावर न पोहोचल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
धोतर्डी येथील रहिवासी विष्णू दशरथ इंगळे यांना दोन मुले व एक मुलगी आहे. त्यांच्या पत्नीचे गत दोन वर्षांपूर्वीच निधन झाल्यानंतर विष्णू इंगळे हे मोलमजुरी करून मुलांचा उदरनिर्वाह करीत होते; मात्र बुधवारी रात्री त्यांनी अचानक तीनही मुलांची हत्या करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये विष्णू इंगळे यांचा मोठा मुलगा अजय विष्णू इंगळे याला विष पाजले, त्यानंतर त्याला विजेचे धक्के दिले; मात्र एवढे केल्यावरही १७ वर्षीय अजयचा मृत्यू न झाल्याने त्याच्या डोक्यात वरवंटा मारुन त्याची हत्या केली, त्यानंतर १६ वर्षीय मनोज विष्णू इंगळे याला विष पाजले; मात्र त्याचा जीव गेला की नाही, हा संशय आल्याने त्यालाही विजेचे धक्के दिल्यानंतर मनोजचा मृत्यू झाला. दोन मुलांची हत्या केल्यानंतर विष्णू इंगळे याने शिवानी नामक १५ वर्षीय चिमुकल्या मुलीला विष पाजले. त्यानंतर तिलाही विजेचे धक्के देऊन तिची हत्या केली. तीनही मुलांची हत्या केल्यानंतर विष्णू इंगळे याने स्वत:ला विजेचे धक्के दिले; मात्र त्रास सहनशक्तीपलीकडे असल्याने त्याने नंतर गळफास घेतला; मात्र गळफास घेण्यात यशस्वी न झाल्याने त्याने स्वत:च्या शरीरावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला, यामध्ये गंभीर जखमी झाल्यानंतर तो घरातच कोसळला, तीन मुलांचे मृतदेह घरात पडलेले होते, तर विष्णू इंगळे हा मरणाच्या उंबरठ्यावर असताना या घटनेची माहिती बोरगाव मंजु पोलिसांना देण्यात आली, तसेच १०८ या रुग्णवाहिकेलाही ८ वाजताच्या सुमारास माहिती देण्यात आली; मात्र रात्री १० वाजेपर्यंत बोरगाव मंजु पोलीस घटनास्थळावर दाखल झाले नाही. रुग्णवाहिकाही १० वाजेपर्यंत न आल्याने विष्णू इंगळे हा उपचारासाठी तडफडत होता. यासंदर्भात बोरगाव मंजु पोलिसांशी संपर्क साधला असता, प्रभारी ठाणेदार वैभव पाटील यांना घटनेची माहितीही नसल्याचे समोर आल्याने अकोला पोलीस एवढ्या गंभीर घटनेनंतरही झोपेचे सोंग घेऊन असल्याचे दिसून आले.