अकोला : जिल्ह्यासह शहरात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा व मनपा प्रशासनाने सतर्क हाेत नागरिकांना काेराेना चाचणीचे आवाहन केले. चाचणीचा अहवाल नसेल तर दुकानांना सील लावल्या जाईल, या धास्तीपाेटी व्यापाऱ्यांनी चाचणीसाठी पुढाकार घेतला. शनिवारी जिल्हा व मनपा प्रशासनाने संयुक्तरीत्या सुरू केलेल्या चाचणी केंद्रांवर तब्बल ४ हजार ५०६ नागरिकांनी रॅपिड ॲन्टिजेन व ‘आरटीपीसीआर’चाचणी केल्याचे समाेर आले आहे. काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी लाॅकडाऊनचा निर्णय लागू केला. याचा परिणाम विविध प्रकारचे उद्याेग व व्यवसायांवर हाेत असल्याचे पाहून व्यापाऱ्यांनी दुकाने खुली करण्याची परवानगी मागितली. यासाठी व्यापारी व कामगारांना काेराेना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. अन्यथा दुकानांना सील लावण्याची भूमिका घेत महापालिका प्रशासनाने शुक्रवारी दुकानांना सील लावण्याची कारवाई केली. कारवाईच्या धास्तीपाेटी शनिवारी व्यापारी, कामगार व काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांनी चाचणीसाठी एकच गर्दी केली. यादरम्यान, मनपाचे नागरी आराेग्य केंद्र व याव्यतिरिक्त व्यापारी संघटना, नगरसेवकांच्या मदतीने सुरू केलेल्या चाचणी केंद्रांवर या एकूण ४ हजार ५०६ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. स्वॅब देण्यासाठी प्रथमच इतक्या माेठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
३ हजार ६०२ जणांना दिलासा
काेराेना चाचणी केंद्रांवर ७६९ नागरिकांनी ‘आरटीपीसीआर’द्वारे चाचणी केली. तसेच ३७३७ नागरिकांनी रॅपिड ॲन्टिजेन चाचणीला प्राधान्य दिले. यामधून १३५ नागरिकांचे अहवाल पाॅझिटिव्ह प्राप्त झाले असून ३ हजार ६०२ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
या ठिकाणी हाेइल चाचणी
माेठी उमरी येथील विठ्ठल मंदिर, सातव चौक, कस्तुरबा गांधी रुग्णालय, रत्नम लॉन राऊतवाडी, चौधरी विद्यालय रतनलाल प्लॉट, जीएमडी मार्केट रामनगर, मनपा शाळा क्र.१६ आदर्श काॅलनी, हरिहरपेठ, नायगाव, किसनीबाई भरतीया रुग्णालय, मनपा आयुर्वेदिक दवाखाना अशोक नगर या ठिकाणी चाचणी केली जाणार आहे.
शहरात कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे झाले आहे. नियमांचे पालन काटेकाेरपणे केल्यास कुटुंबीयांचा जीव धाेक्यात येणार नाही. चाचणीसाठी इतर जिल्ह्यातून टेस्टिंग किट मागविल्या जातील, तसा प्रस्ताव विचाराधीन आहे.
-डाॅ. पंकज जावळे, प्रभारी आयुक्त, मनपा