- आशिष गावंडे
अकाेला: शहरात २१ जुलैच्या मध्यरात्री आलेल्या पुरसदृष्य परिस्थितीमुळे सखल भागात राहणाऱ्या नागरिकांची दाणादाण उडाली. निगरगठ्ठ महापालिकेच्या दुर्लक्षामुळे विविध भागातील नाल्यांना पूर आल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. डाेक्यावरचे छत वाहून गेल्याने चिमुकल्यांसह वयाेवृद्धांना उघड्यावर राहण्याची वेळ आली. पूर ओसरल्यानंतरही पाचव्या दिवशी नागरिकांच्या मनातील धास्ती अन् वेदना कायम असल्याचे पाहावयास मिळाले. त्यांच्या मदतीसाठी नगरसेवकांची धावाधाव सुरूच हाेती.
मनपा प्रशासनाने नाले सफाईकडे पाठ फिरविल्याने घाणीने तुडुंब साचलेल्या नाल्यांमधून पुराच्या पाण्याचा निचरा हाेऊ शकला नाही. स्थानिक राजकारण्यांच्या संमतीने काही बांधकाम व्यावसायिकांनी निकष, नियम धाब्यावर बसवित सखल भागात ले-आउटचे निर्माण करून, नियमबाह्यरीत्या रहिवासी इमारती व डुप्लेक्सचे निर्माण केले. सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे बांधकाम केलेच नाही. परिणामी, प्रभाग क्रमांक १८ अंतर्गत येणाऱ्या हद्दवाढ क्षेत्रातील अकाेली बु., परिसर एमराॅल्ड काॅलनी, माताेश्री काॅलनी भागात पाचव्या दिवशीही पुराचे पाणी कायम आहे. प्रभाग १७ मधील माेर्णा नदीकाठच्या रमाबाई आंबेडकरनगर, अण्णाभाऊ साठेनगर, तसेच प्रभाग ९ अंतर्गत भगिरथ वाडी, आरपीटीएस भागात गरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत.
नाला तयार करण्याच्या कामाला गती
प्रभाग १८ मधील अकाेली बु., हिंगणा भागातून माेर्णा नदीचे पाणी माताेश्री काॅलनी, एमराॅल्ड काॅलनीत शिरले. तेथून गंगा नगर व पुढे प्रभाग ८ मध्ये शिरले. उच्चभ्रू नागरिकांच्या काॅलनीतील पाण्याचा निचरा हाेण्यासाठी मूळ मालमत्ताधारकांनी नाल्यांची व्यवस्थाच उभारली नाही. समस्येवर ताेडगा म्हणून प्रभागाच्या नगरसेविका जयश्री दुबे यांनी माेठा नाला तयार करण्याचे काम हाती घेतल्याचे दिसून आले.
घरासमाेर साचलेले पाणी कायम असल्याने, एकमेकांच्या टेरेसवरून बाहेर जावे लागत आहे. घरातील सर्व वस्तू पाण्यात भिजल्या. त्या काळाेख्या रात्री इमारतीमधील रहिवाशांनी आश्रय दिला.
- सुनंदा अशाेक शिरसाट रहिवासी,एमराॅल्ड काॅलनी
रात्री अचानक घरात पाणी शिरले. नंतर पाच ते सहा फुटांपर्यंत पातळी वाढल्याने कुटुंबीयांना घेऊन घराच्या टेरेसवर चढलाे. अखेर नजीकच्या इमारतीमध्ये रात्र काढली. अजूनही पाण्याचा निचरा झाला नाही.
- दीपेश ठाकूर रहिवासी एमराॅल्ड काॅलनी
दाेन वर्षांपूर्वी डुप्लेक्स खरेदी करून वास्तव्याला आलाे. ‘त्या’ रात्री पुराच्या पाण्यासाेबतच साप घरात शिरले. साहित्य खराब झाले. जीव मुठीत घेऊन रात्र काढली. पाण्याचा निचरा हाेण्यासाठी नाल्यांची व्यवस्थाच केली नाही.
-शालीग्राम बाेंडे रहिवासी माताेश्री काॅलनी
ले-आउटधारकाने नाल्यांची व्यवस्था न केल्याचा परिणाम भाेगावा लागत आहे. साचलेल्या पाण्यातून दुर्गंधी पसरली असून, माेठे साप आढळून येत आहेत. रस्ते, पथदिवे व पाण्यासाठी जलवाहिनीची सुविधा नाही. आराेग्याला धाेका झाला आहे.
- ज्याेती वाकडे, रहिवासी माताेश्री काॅलनी
नाल्यामध्ये जलकुंभी असल्याने पुराच्या पाण्याचा निचरा न हाेता ते थेट घरात शिरले. त्याच्या प्रवाहामुळे घराची भिंत काेसळून घरातील साहित्य वाहून गेले. शासनाने त्वरित मदत द्यावी.
- तुळसाबाई अरुण वानखडे रहिवासी, रमाबाई आंबेडकरनगर
माेर्णा नदीतील राजेश्वर सेतू पुलाजवळ कचऱ्यामुळे पाण्याला आडकाठी झाली. त्यामुळे पाण्याचा प्रवाह घराकडे वळला. त्यात संपूर्ण घर भुईसपाट झाले. घरातील सर्व साहित्य वाहून गेले. लहान मुलांना साेबत घेउन जीव वाचविला.
- दुर्गा केशव गायकवाड रहिवासी, अण्णाभाऊ साठेनगर