मार्च महिन्यात गहू काढणीवर असताना सलग चार दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात गहू, कांदा, तिळासह फळपिकांचे नुकसान झाले होते. मागील दहा दिवस उन्हाचा पारा चढला होता. त्यामुळे यापुढे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, जिल्ह्यात गुरुवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची गहू, हरभरा विकण्याची लगबग सुरू आहे. अशात या ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जमिनीपासून साधारण ३ किमी अंतरावर सक्रिय असलेले चक्राकार वारे, तापमानात होणारी घट आणि निरंतर वाढणारी आर्द्रता तसेच तेलंर्णाना, कर्नाटक सीमा क्षेत्रात सक्रिय असलेले सिस्टिमचे विस्तारित टोक विदर्भाच्या पश्चिम-दक्षिण सीमेपर्यंत पोहोचले आहे. गुरुवारच्या उपग्रह छायाचित्रानुसार मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, विदर्भातील वाशिम, यवतमाळ, बुलडाणा, अमरावती (धारणी, चिखलदरा तालुका), अकोला, चंद्रपूर तर नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यांच्या सीमा परिसरात तसेच सोलापूर-सांगली, उत्तर सातारा इत्यादी जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळलेले होते.
--कोट--
अकोला जिल्ह्याच्या शेजारील बुलडाणा, अमरावती जिल्ह्यांत गडगडाटसह वादळी पावसाची शक्यता दिसून येत आहे. निरंतर ढगाळ वातावरण आणि आर्द्रता रात्रीच्या वातावरणात ‘उमस’ तसेच किंचित तापमान वाढ होण्याची शक्यता आहे.
-संजय अप्तूरकर, हवामान अभ्यासक
--बॉक्स--
तापमानात घट; पारा ४२ अंशावर
जिल्ह्यात गुरुवारी ढगाळ वातावरण असल्याने तापमानात घट पाहावयास मिळाली. बुधवारी जिल्ह्याचा पारा ४२.९ अंश सेल्सिअस होता. दोन दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता असताना गुरुवारी पारा घसरून ४२.० अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.