रवि दामोदर
अकोला : तालुक्यातील दोनवाडा गाव. गावाच्या एका भागातून पूर्णामाय वाहते, तर दुसऱ्या भागातून कोल्हा नाला. जिल्ह्यात अनेक गावे दुष्काळाने होरपळत असताना दोनवाडा पाणीदार आहे; मात्र अस्मानी संकटामुळे हेच जलस्त्रोत ग्रामस्थांसाठी शाप ठरू लागले आहेत. गत महिन्यात कोल्हा नाल्याला पूर आल्याने गावाचा संपर्क तुटला होता. गावातील एका महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी काटेपूर्णा नदी व कोल्हा नाल्याला पूर आल्याने शेतजमीन पाण्याखाली गेली असून, गावाचा संपर्क पुन्हा तुटला आहे.
जिल्ह्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनामार्फत नागपूर येथील एसडीआरएफ पथक दाखल झाले आहे. या पथकाने गावातील तब्बल २५-३० जणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे; मात्र गावाला पुराचा वेढा कायम असल्याने नागरिकांना रात्र भीतीच्या छायेत घालवावी लागत आहे. कोलार नाल्यावर उंच पूल करावा, अशी ग्रामस्थांची मागणी अनेक वर्षांपासून अद्यापही अपूर्णच असल्याने गावातील समस्या जैसे थे आहे.
----------------------------------
ग्रामस्थांच्या व्यथा
गावातून पूर्णा नदी वाहते. पावसाळ्यात पूर्णेला व कोल्हा नाल्याला पूर आल्यास गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे ग्रामस्थांना गावातच अडकून पडावे लागते. गावात आरोग्य सुविधा नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने लक्ष देऊन गावात डोंगा उपलब्ध करून द्यावा.
- मोहन झटाले, माजी उपसरपंच, दोनवाडा
-----------------------
गावाला अकोल्याला जोडणाऱ्या रस्त्यावर कोल्हा नाला वाहतो. पावसाळ्यात कोल्हा नाल्याला पूर असल्याने नेहमीच गावाचा संपर्क तुटतो. कोल्हा नाल्यावरील पूल उंच असल्यास समस्या निकाली निघणार आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन गावात आरोग्य सुविधा व कोल्हा नाल्यावर उंच पूल बांधावा.
- अरुणा श्रीहरी झटाले, दोनवाडा
-----------------------
कोल्हा नाल्याला पूर आल्याने गावाला जवळपास दीड किमी पुराचा वेढा पडला आहे. त्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. गावातील नाल्याकाठची शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. पुलाची उंची लहान असल्याने नेहमीच असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देऊन पुलाची उंची वाढवावी व गावाला डोंगा उपलब्ध करून द्यावा.
-श्रीकृष्ण झटाले, सरपंच पती, दोनवाडा
-----------------
अनेकांनी दिला मदतीचा हात
गावाला पुराचा वेढा पडल्याने रुग्णांसह ग्रामस्थ अडकून पडले होते. त्यांना एसडीआरएफच्या पथकाने सुरक्षितस्थळी हलविले. पथकाला दोनवाडा, कासली, म्हातोडी आदी गावांतील ग्रामस्थांसह युवकांनी मदत केली. यामध्ये दोनवाडा येथील श्रीकृष्ण झटाले, दिलीप झटाले, शुभम झटाले, पोलीसपाटील चव्हाण, माजी उपसरंपच गिरी, कासलीचे गणेश काळमेघ, खरप बु.चे सतीश इंगळे यांच्यासह पत्रकार श्रीकृष्ण घावट आदींनी मदत केली.
-------------------------
महसूल विभागाच्या पथकानेही केली पाहणी
दोनवाड्याचा संपर्क तुटल्याची माहिती मिळताच तहसीलदार बळवंत अरखराव, मंडळ अधिकारी डी. एस. काळे, तलाठी अंजली हिवरखेडकर, घूसरचे मंडळ अधिकारी नितीन शिंदे, पळसोचे मंडळ अधिकारी शेख अन्सारोद्दीन, शोध व बचाव पथकाचे सुनील कल्ले, हरिहर निमकंडे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून सहकार्य केले.
------------------------------
शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली
दोनवाड्याच्या पूर्णा नदीला व कोल्हा नदीला पूर आल्याने नाल्याकाठची व नदीकाठची शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली आली आहे. अतिपावसामुळे खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीन, तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांकडून होत आहे.