अकोला : गणेश घाटावर झालेल्या श्रींच्या विटंबनेनंतर शरद कोकाटे यांनी 'घरचा इको फ्रेंडली गणेशोत्सव' या संकल्पनेला प्रारंभ केला. या निमित्याने ते दरवर्षी सामाजिक घडामोडीवर नवीन संदेश देतात. यंदा राज्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांनी शेतकर्यांना धीर देणारा संदेश दिला आहे.गत पाच वर्षांपूर्वी शरद कोकाटे हे त्यांच्या चिमुकल्या मुलीला घेऊन गणेश घाटावर गेले असता, विसर्जनादरम्यान श्रींच्या मूर्तीची विटंबना झाली. या घटनेमुळे त्यांच्या मुलीला दु:ख झाल्याचे पाहून त्यांनी घरीच श्रींच्या विसर्जनाचा निर्धार केला. त्यांच्या या निर्धारातूनच ह्यघरचा इको फ्रेंडली गणेशोत्सवह्ण ही संकल्पना उदयास आली. गोरक्षण रोडस्थित सहकारनगर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सवाची सुरुवात केली. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक संदेश देणार्या प्रतिकृती तयार करायला सुरुवात केली. गणेशोत्सवादरम्यान झालेल्या विविध स्पर्धांमध्ये त्यांना पारितोषिकदेखील मिळाले आहेत. यंदा राज्यात दुष्काळाचे सावट असून, शेतकरी वर्ग हतबल झाल्याने आत्महत्येचे प्रमाणही वाढले आहे. परंतु, श्रींच्या आगमनासोबतच पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या अनुषंगाने शरद कोकाटे यांनी बाप्पांना बळीराजाच्या रूपात दाखवून 'बळीराजा भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' असा संदेश देणारी प्रतिकृती केली आहे. घरोघरी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून त्यांनी शाळा, महाविद्यालयात कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.
इको फ्रेंडली गणेशोत्सवातून दिला शेतक-यांना धीर
By admin | Published: September 21, 2015 1:32 AM