दहा दिवसांत ४ शाळा बंद!
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या ५४९ शाळांपैकी ४१९ शाळा सुरू करण्यास परवानगी दिली; परंतु काही दिवसांमध्येच काही शिक्षकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे या शाळा बंद करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे ३५० विद्यार्थ्यांना आता पुन्हा ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागणार आहे. तसेच तिसऱ्या लाटेची संभावना पाहता, पालकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास नकार देत आहेत.
जिल्ह्यात एकूण शाळा - ५४९
सध्या सुरू असलेल्या शाळा- ४१५
शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती- ४०,८८५
विद्यार्थी मजेत, पालक चिंतेत
आम्ही दररोज शाळेत जात आहोत. कोरोनाचा प्रभाव आता कमी झाला आहे. घरी ऑनलाइन शिक्षण घेण्याचा कंटाळा आला आहे. दीड वर्षापासून मित्रांपासून दूर आहोत; परंतु शाळा सुरू झाल्यामुळे आनंदित आहोत.
-वैभव राजगुरे, आठवीचा विद्यार्थी
दीड वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा कंटाळा आला होता. आता शाळा सुरू झाल्यामुळे नियमित शाळेत जात आहे. कोरोनाची भीती असल्यामुळे पालक व शाळेकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
-स्वानंदी आठवले, नववीची विद्यार्थिनी
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शाळा सुरू झाल्या; परंतु तिसरी लाट येण्याची भीती आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याविषयी काळजी वाटते. सध्या तरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी दिसत असल्यामुळे मुलांना शाळेत पाठवीत आहे; परंतु मुलांविषयी चिंता वाटते.
-राजेश बोनगीरवार, पालक