अकोला: जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा घटत असतानाच व्हायरल तापाने डोके वर काढले आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे अनेकांमध्ये सर्दी, खोकल्याची लक्षणेही आढळून येत आहेत. त्यामुळे आपल्याला तर कोरोनाची लागण झाली नाही ना, अशी धास्ती नागरिकांमध्ये वाढली आहे.
गत महिनाभरापासून जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय कमी दिसून येत आहे. त्यामुळे अकोलेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता; मात्र वातावरणात अचानक बदल झाल्याने अनेकांना व्हायरल तापाची लक्षणे दिसू लागली आहेत. ताप, अंगदुखी आणि डोकेदुखीच्या तक्रारी घेऊन रुग्ण खासगी रुग्णालयातून उपचार घेत आहेत. अनेकांमध्ये सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे आदी लक्षणेही दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमनाच्या काळात अशी लक्षणे अंगावर काढणे धोक्याचे ठरू शकते. आपल्या जवळच्या किंवा फॅमिली डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी, डॉक्टरांच्या सल्लाने कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
पाणी उकडून घ्या!
सद्यस्थितीत जिल्ह्यात काविळचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी उकडून प्यावे. लहान मुलांच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असा वैद्यकीय सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
हे करा
- लक्षणे आढळताच रुग्णांनी स्वत:ला होम क्वारंटीन करावे
- डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरित कोविड चाचणी करावी.
- नियमित हात धुवावे.
- मास्कचा वापर करावा.
- गर्दी करू नये, तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
व्हायरल फिवरमध्ये तीव्र ताप येतो. रुग्णाला थंडीही जाणवते. डोकं आणि अंगदुखीचा त्रास होतो. त्यामुळे आपल्या फॅमिली डॉक्टरांकडून तपासणी करून योग्य औषधोपचार घ्यावा. सद्यस्थितीत अशी लक्षणे अंगावर काढू नये.
- डॉ. फारुख शेख, वैद्यकीय अधिकारी, महापालिका.