शहरात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जमावबंदी आदेश लागू केला हाेता. दरम्यान, शहरातील व्यावसायिकांनी दुकाने खुली करण्याचा तगादा लावून धरला असता दुकानातील कामगारांसह सर्वांना काेराेना चाचणी अनिवार्य करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला हाेता. चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल तरच दुकान खुले ठेवण्याची मुभा आहे. मंगळवारी मनपा उपायुक्त डाॅ.पंकज जावळे यांनी गांधी राेड व टिळक राेडवरील दुकानांची तपासणी केली असता, गांधी राेडवरील एका दुकानातील कामगाराकडे चाचणी अहवाल आढळून आला नसल्याने संबंधित दुकानाला सील लावण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, बाजार विभागातील सुरेंद्र जाधव, सनी शिरसाट, सुरक्षा रक्षक सै. रफिक, अभिजित सावंग, पोलीस कर्मचारी अब्दुल काझी उपस्थित हाेते.
तीन रुग्णांच्या विराेधात पाेलिस तक्रार
काेराेना पाॅझिटिव्ह असल्यानंतरही घरात न थांबता घराबाहेर बिनधास्तपणे वावर करणाऱ्या तीन रुग्णांच्या विराेधात मनपाच्यावतीने पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदविण्यात आली आहे. पश्चिम झाेन अंतर्गत दाेन रुग्णांविराेधात क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र टापरे व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अमर खोडे यांनी जुने शहर पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली. तसेच उत्तर झाेनमधील एका रुग्णाविराेधात क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते यांनी पाेलिस तक्रार दिली.
...तर अशा रुग्णांविराेधात तक्रार करा!
काेराेनाची लागण झाल्यानंतरही रुग्णालयात किंवा घरात न थांबता घराबाहेर संचार करणाऱ्या बाधित व्यक्तीच्या विराेधात माहिती देण्यासाठी मंगळवारी प्रशासनाने टाेल फ्री क्रमांक जारी केला. संबंधित झोन अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाेबतच टोल फ्री क्रमांक 18002335733 आणि टेलिफोन क्रं. 0724-2434412वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.