अकोला : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. लसीकरणासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी बंधनकारक केली असून पहिल्या दिवशी नोंदणी करणाऱ्यांना लसीकरण केंद्रांमध्ये कूपनचे वाटप करण्यात आले. आता अपॉइंटमेंटशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात येत असून ऑनलाइन नोंदणी करताना अपॉइंटमेंट मिळत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे.
संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या लाटेमध्ये अनेकांना कोरोनाची बाधा होत असल्याचे समोर येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली असून यामुळे वैद्यकीय आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना १ मेपासून लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी संबंधितांना केंद्र शासनाच्या वेबसाइटमध्ये दिलेला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचा आहे. यामध्ये महापालिका प्रशासनाच्या अधिकृत लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणाऱ्या नागरिकांना १ मे रोजी केंद्रात १०० जणांना कूपनचे वाटप करण्यात आले. त्यामुळे उर्वरित असंख्य तरुणांना घरी परत जावे लागले. लसीकरण केंद्रांमध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांची उसळलेली गर्दी व कोलमडलेल्या नियोजनाची परिस्थिती शहरासह राज्यात सारखीच होती, असे दिसून आले. त्यामुळे आता संबंधित लसीकरण केंद्रामध्ये जेवढ्या प्रमाणात लस दिल्या जाईल तेवढ्याच प्रमाणात युवक व नागरिकांना अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय लस देता येणार नसल्याचे मनपाच्या यंत्रणेकडून स्पष्ट केले जात आहे.
नोंदणी होते; अपॉइंटमेंट नाहीच!
मनपा प्रशासनाने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी शहरात पाच ठिकाणी लस देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये कस्तुरबा गांधी रुग्णालय, किसणीबाई भरतीया रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय तसेच आयुर्वेदिक महाविद्यालय यांचा समावेश आहे. लस घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली असता अनेकांना नोंदणी क्रमांक प्राप्त होतो; परंतु अपॉइंटमेंट मिळत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे.
वेळ निश्चित करावी!
मनपाच्या लसीकरण केंद्रांमध्ये लसीचे दोनशे डोस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ऑनलाइन नोंदणीची नेमकी वेळ नसल्यामुळे नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे महापालिकेने अपॉइंटमेंट उपलब्ध व्हावी, या उद्देशातून नोंदणीची वेळ निश्चित करण्याची मागणी होत आहे.