अकाेला : अकाेल्यात चाेरांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत असून आता थेट पाेलिसांच्या घरांनाच चाेरट्यांनी लक्ष्य केल्याचे समाेर आले आहे. सिटी काेतवाली पाेलीस स्टेशनमध्ये कार्यरत एका महिला पाेलीस उपनिरीक्षक सुट्टीत घरी असताना त्यांच्या घरी चाेरट्यांनी हात साफ केला असून चक्क सर्व्हिस रिव्हॉल्व्हरवरच डल्ला मारला आहे. ही घटना २५ एप्रिल राेजी उघडकीस आली.
अकाेल्याच्या सिटी काेतवाली पाेलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सरिता कुवारे या कार्यरत आहेत. त्या २१ ते २५ एप्रिल या कालावधीत सुट्टीवर होत्या, सुट्टीनंतर त्या अकाेल्यातील घरी परतल्यावर कर्तव्यावर हजर हाेण्यासाठी तयारी करत असताना घरात नेहमीच्या ठिकाणी ठेवण्यात आलेले सर्व्हिस रिव्हॉल्वर दृष्टीस पडले नाही. त्यांनी शाेधाशाेध करूनही सर्व्हिस रिव्हॉल्वर सापडले नसल्याने ते चाेरीला गेल्याची बाब कुवारे यांच्या लक्षात आली. केवळ सर्व्हिस रिव्हॉल्व्हरच नव्हे तर काही जिंवत काडतुसे गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तातडीने ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. या प्रकरणात कुवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये सात अज्ञात व्यक्तींविरुद्ध भादंवि कलम ३८० नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केवळ सर्व्हिस रिव्हॉल्व्हरच चाेरले
कुवारे यांच्या घरातून केवळ सर्व्हिस रिव्हॉल्व्हर तसेच काही जिवंत काडतुसे चाेरीस गेल्याचे समाेर आले आहे. चाेरट्यांनी घरात इतर कोणत्याही वस्तूची चाेरी केली नाही. सर्व वस्तू कायम आहेत. त्यामुळे चाेरटे केवळ सर्व्हिस रिव्हॉल्व्हर चाेरीसाठीच आले हाेते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणात पाेलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.