- राजरत्न सिरसाट
अकोला : शेतीची बांधबदिस्ती, तंत्रज्ञान न वापरल्याने विदर्भाच्या खारपाणपट्ट्यातील हेक्टरी २६ टनाच्यावर सुपीक माती दरवर्षी पावसासोबत वाहून जात आहे. या मातीसोबतच शेतातील अन्नद्रव्य वाहून जात असल्याने जमिनीची पोत घसरत असून, त्याचा परिणाम उत्पादनक्षमतेवर होत असल्याचा निष्कर्ष अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने काढला आहे. तसेच शासनातर्फे सध्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजना राबविण्यात येत आहे. पण, शेततळ््यात माती जाणार नाही, याचीही उपाययोजना पावसापूर्वीच करणे गरजेचे असल्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.पश्चिम विदर्भात खारपाणपट्टा असून, भूगर्भातील पाणी समुद्राच्या पाण्यासारखे खारे आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर या भागातील शेतकºयांची भिस्त असल्याने शेतकरी दरवर्षी चातकासारखे पावसाच्या प्रतीक्षेत असतात. यावर्षी मुबलक पावसाचे भाकीत वर्तविण्यात आल्याने शेतकºयांचे डोळे आतापासूनच नभाकडे लागले आहेत. शेतात पाणी साचवून ठेवण्यासाठी शेतकºयांनी शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत शेतकºयांनी गोडे पाणी साचवून ठेवण्यासाठी शेततळे बांधली आहेत. पण, या शेततळ््यात माती जाणार नाही ही काळजी घ्यावी लागणार आहे. शेततळ््याचे आयुष्य चार वर्षांचे आहे. हे आयुष्य वाढवायचे असेल, तर शेतकºयांना पावसासोबत माती शेततळ््यात वाहून जाणार नाही, याची उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी फांदेरी सांडवा तयार करणे गरजेचे आहे.शेतातील सुपीक माती वाहून जाऊ नये, यासाठी पावसापूर्वी शेतात वाफे तयार करणे महत्त्वाचे आहे. उताराला आडवे समतल चर, उताराला आडवी पेरणी, सफाट शेतावर वाफे तयार करावे, कंटुर शेती, पेरणीनंतर ३० दिवसांनी सरी, ओरंबे काढणे गरजेचे आहे. या उपाययोजना केल्यास पावसासोबत माती वाहून जाण्याचे प्रमाण मात्र कमी करता येते. ज्या शेतकºयांनी या तंत्रज्ञानाचा वापर शेतात केला, त्यांच्या शेतातील माती वाहून जाण्याचे प्रमाण हे हेक्टरी ११ टनाने कमी झाले.
मातीतील ‘एनपीके’ घटतोय !या सुपीक मातीसोबतच अन्नधान्य निर्मितीसाठी लागणारे महत्त्वाचे अन्नद्रव्य मातीसोबत वाहून गेल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. यामध्ये नत्राचे हेक्टरी प्रमाण हे नऊ किलो असून, स्फुरद ८.९ किलो एवढे आहे, तर पालाश हेक्टरी ९.५ (एनपीके) किलो या प्रमाणात पावसासोबत वाहून जाण्याचे प्रमाण आहे.
शेततळ््यासह शेतातील सुपीक माती पावसासोबत वाहून जाऊ नये, यासाठीच्या उपाययोजना सुचविल्या असून, शिफारसही केली आहे. शासनाने या शिफ ारशींना मान्यता दिली आहे.- डॉ. सुभाष टाले, विभाग प्रमुख, जल व मृद संधारण, डॉ. पंदेकृवि, अकोला.