अकोला: विज्ञान विषय तसा कुतूहलाचा. त्यात लक्ष घातले किंवा शिक्षकांनी आनंददायी शिक्षणातून विज्ञान विषय शिकविला तर विद्यार्थ्यांची संशोधनवृत्ती वाढीस लागते. याचा प्रत्यय जिल्हा विज्ञान प्रदर्शनातून आला. शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातून अनेक रॅन्चो लपले आहेत. आदिवासी वस्ती असलेल्या तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी हे छोटेसे गाव. या गावातील संत लहानुजी महाराज विद्यालयात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी कल्पकतेने सायकलच्या चाकाचा वापर करून शेतात खत टाकणी यंत्र बनविले आहे.असे यंत्र कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ, अभियंत्यांकडून बनविणे अपेक्षित असताना, केवळ ऐकीव ज्ञानाने या विद्यार्थ्यांनी शेतीसाठी आवश्यक असलेले खत टाकणी यंत्र बनवून विज्ञान प्रदर्शनात सर्वांची शाबासकी मिळविली. इयत्ता नववीमध्ये शिकणारे शिवा भिलावेकर आणि वैभव निचळ या दोघांचे आई-वडील शेतमजूर. परिस्थिती गरिबीची असल्याने, दोघांनाही सुटीच्या दिवशी शेतावर जावे लागते. कधी निंदणाला तर कधी सोंगणी, मरळी आणि खत टाकायलासुद्धा जावे लागते. रासायनिक खत हाताने फेकायचे म्हटले तर हातांची बोटे फुटतात. त्वचासुद्धा खराब होते. यातून उपाय शोधण्याचा विचार दोघांनी केला. त्यासाठी त्यांना मुख्याध्यापिका दीपाली वानखडे, शिक्षिका रेणुका बाजारे यांनी मार्गदर्शन केले. शिवा व वैभवने सायकलचे एक चाक, हॅण्डल, पाइप, १0 लीटर तेलाची टाकी घेऊन हे खत टाकणी यंत्र बनविले. या यंत्रामुळे शेतामध्ये पिकांना सहज खत देता येते. हे या विद्यार्थ्यांनी प्रतिकृतीतून सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांच्या खत टाकणी यंत्राने जिल्हा विज्ञान प्रदर्शनात दुसरा क्रमांक पटकावला आहे. एवढेच नाही, तर या यंत्राची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठीसुद्धा निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने बनविलेल्या खत टाकणी यंत्राचे गावकऱ्यांनीसुद्धा भरभरून कौतुक केले.