अकोला: येत्या दोन दिवसांवर धनत्रयोदशी येऊन ठेपली असताना शहराच्या विविध भागात अंधाराचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. शहरातील प्रमुख मार्गांसह प्रभागातील पथदिवे नादुरुस्त असून, नागरिकांना ऐन सणासुदीच्या दिवसांत त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार पाहता मनपा प्रशासनाने नियुक्त केलेले कंत्राटदार कोणत्या बिळात दडून बसले आहेत,असा सवाल उपस्थित होत असून, विद्युत विभागाला कर्तव्याचा विसर पडल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.सिमेंट रस्त्यांवरील एलईडी पथदिव्यांच्या व्यतिरिक्त इतर मुख्य मार्गांवर पथदिव्यांची समस्या निर्माण झाली आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने झोननिहाय कंत्राटदारांची नियुक्ती केली. पथदिव्यांवर महिन्याकाठी १२ लाख रुपये खर्च होत असले, तरी शहरातील मुख्य मार्गांवर अद्यापही नादुरुस्त पथदिव्यांची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे. शहरातील बंद पथदिव्यांच्या संदर्भात मनपाच्या विद्युत विभागाने सविस्तर माहिती ठेवणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्यामुळेच कंत्राटदारांचे फावत असून, नादुरुस्त पथदिव्यांची १५-१५ दिवसातही दुरुस्ती केली जात नसल्याची परिस्थिती आहे.कंत्राटदार निरंकुश; विद्युत विभाग झोपेतमहापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून शहरात एलईडीच्या कामांचा गवगवा केला जात असतानाच दुसरीकडे पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडल्यामुळे पथदिव्यांचा पुरता बोजवारा उडाल्याची परिस्थिती आहे. मुख्य रस्त्यांवरील पथदिवे दिवसा सुरू अन् रात्री बंद राहत असल्याने महापालिकेने नियुक्त केलेले झोननिहाय कंत्राटदार दिवसभर करतात तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. निरंकुश कंत्राटदारांवर विद्युत विभागाचा वचक नसल्यामुळे पथदिव्यांची दुरुस्ती होत नसल्याचे दिसून येत आहे.
या भागात अंधाराचे साम्राज्यनेहरू पार्क चौक ते सिव्हिल लाइन चौक, नेहरू पार्क चौक ते आरडीजी महाविद्यालय, कमला वाशिम बायपास चौक ते हरिहरपेठ रोड, नवीन किराणा बाजार ते धाबेकर फार्म हाऊस, जिजाऊ नगर कौलखेड, प्रभाग ८ मधील श्रद्धा कॉलनी, प्रभाग ९ मधील आरपीटीएस परिसर, प्रभाग क्रमांक ३ मधील खरप परिसर यांसह विविध भागात अंधार पसरल्याची परिस्थिती आहे.