लोकमत न्यूज नेटवर्कअकोलो : सर्जनशील मातीचे प्राण असतात बैल, शेतकर्यांच्या दाराची शान असतात बैल, अंगी त्यांच्या भिनलेली, श्रम आणि सोशिकता, मालकाच्या व्यथेचेही कान असतात बैल. शेतकर्यांचे दैवत असलेल्या बैलांचा पोळा हा सण सोमवारी सर्वत्र साजरा होत आहे. कृषी व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणार्या या वृषभराजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.अस्मानी, सुल्तानी संकटांनी विदारक स्थितीत सापडलेल्या शेतकर्यांच्या वेदनेचे भागीदार व त्याच्या वाताहतीचे मूक साक्षीदार असतात ते फक्त बैलच! शेतकर्याच्या सोबतीने दिवसभर उन्हा-तान्हात राबताना बैल कधीच काम जास्त झाल्याची तक्रार करीत नाहीत. जीवात जीव असेपर्यंत नांगर, वखर ओढायचा व आपल्या पोशिंद्याच्या संसाराला हातभार लावायचा एवढेच त्यांना कळते. कधी वैरण कमी झाली म्हणून बैल काम टाळण्याचा प्रयत्न करीत नाहीत. मालकाच्या फाटक्या संसाराला थिगळे लावण्यासाठी आपले कातडे सोलून द्यायलाही ते मागे पुढे पाहणार नाहीत एवढी कृतज्ञतेची भावना या मुक्या जीवांच्या मनात असली पाहिजे. मालक पाठीवरुन प्रेमाने हात फिरवितो तेव्हा आपले जीवन धन्य झाल्यासारखे त्याला वाटते. हिरवेगार डुलणारे शिवार पाहून धन्यासोबतच त्याची सर्जा-राजाची जोडीही प्रसन्न होते व प्रफुल्लीत मनाने तुरु-तुरु चालायला लागते. मात्र बाजारात माल बेभाव विकून आल्यानंतर परतीच्या वाटेवर त्यांचीही पावले जणू जड होतात. शेतकर्याच्या जीवनाशी एकरुप झालेल्या या वृषभराजाची थोरवी आपल्या पूर्वजांनी जाणली व त्यातूनच ‘पोळा’ सण साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. कित्येक वर्षापूर्वीपासून सुरु झालेली पोळा साजरा करण्याची ही परंपरा आजतागायत सुरु असली तरी त्यात मोठा बदल आता झाला आहे. एकतर बैलांची संख्याच आता झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे आता अनेकांना केवळ मातीचे बैल, पुजूनच समाधान मानावे लागते. यांत्रिकीकरणाने प्रथम बैलांचाच बळी घेतला, ट्रॅक्टर, मळणीयंत्र आल्याने अनेक कामे बैलांशिवाय होवू लागली. त्यामुळे बैलांची शेतीकामात गरज उरली नाही. कृतघ्न माणसाने बैल खाटकाच्या दावणीला बांधले. अन् यातच शेतकर्याचा घात झाला. गोवंश नष्ट होवू लागल्याने शेतीत अनेक समस्या निर्माण झाल्या. रासायनिक खते, किटकनाशकांनी जमिनी नासवल्या. एका वेगळ्याच दुष्टचक्रात शेतकरी अडकला आणि बैलांचा कासरा गळफास म्हणून उपयोगी आला.
पोळ्याचा हा सण, फेडू वृषभाचे ऋण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 1:43 AM
अकोलो : सर्जनशील मातीचे प्राण असतात बैल, शेतकर्यांच्या दाराची शान असतात बैल, अंगी त्यांच्या भिनलेली, श्रम आणि सोशिकता, मालकाच्या व्यथेचेही कान असतात बैल. शेतकर्यांचे दैवत असलेल्या बैलांचा पोळा हा सण सोमवारी सर्वत्र साजरा होत आहे. कृषी व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणार्या या वृषभराजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
ठळक मुद्देशेतीत राबणार्या मुक्या जीवांचा आज गौरव सोहळा