गोवर, रुबेला हे आजार प्रामुख्याने लहान मुलांमध्ये उद्भवतात. त्या अनुषंगाने लहान मुलांचे लसीकरणदेखील केले जाते. लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही या आजाराचा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे २०१८ मध्ये राज्यभरात शालेय स्तरावर १५ वर्षांपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांमध्ये गोवर, रुबेलाचे ‘एमआर’ लसीकरण करण्यात आले होते. त्यामुळे गोवर, रुबेला रोखण्यात आरोग्य यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. असे असले तरी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा आजार उद्भवण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णांना तापीसोबतच अंगावर पुरळ आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.
असे केले जाते निदान
कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला ताप व पुरळ आल्यापासून २८ दिवसांच्या आत गोवर, रुबेलाची तपासणी करणे आवश्यक आहे.
त्यामुळे पुरळ आल्यापासून सात दिवसांच्या आत रुग्णाचे रक्तजल नमुने, तसेच घशाचा स्वॅब किंवा लघवीचे नमुने तपासले जातात.
सद्य:स्थितीत सर्वत्र व्हायरल फिव्हरची साथ सुरू आहे. यातील अनेक रुग्णांना डेंग्यू, मलेरियाचे लक्षणे आहेत; मात्र रुग्णाला तापीसोबतच पुरळ असल्यास ते गोवर, रुबेलाचे लक्षणे असू शकतात. ही लक्षणे कुठल्याही वयोगटातील रुग्णांमध्ये दिसू शकतात. त्यामुळे नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करता आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. १५ वर्षांपर्यंतच्या बहुतांश बालकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने गोवरचा धोका कमी आहे.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा लसीकरण अधिकारी, अकोला.