अकोला : कीटकजन्य आजारांच्या प्रादुर्भावास वेसण घालण्यासाठी आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न होत असले, तरी आरोग्य सेवा मंडळाच्या अकोला विभागातील अकोल्यासह पाच जिल्ह्यांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मात्र वाढतच आहे. १ जानेवारी २०१८ ते ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांमध्ये डेंग्यूचे ३३१ पॉझिटिव्ह, तर संशयित रुग्णांची संख्या ११०६ वर पोहोचल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे.‘एडीस इजिप्ती’ या डासापासून डेंग्यू हा आजार होतो. परिसर आणि घराघरांमध्ये स्वच्छ पाण्यात या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याने डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही वाढतच आहे. तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, अंग दुखणे, रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे आदी लक्षणे असलेले रुग्ण शहर व जिल्ह्यात आढळून येत आहेत. सर्वोपचार रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्ये उपरोक्त लक्षणे असलेले रुग्ण दाखल होत आहेत. डेंग्यूचा वाढत्या प्रादुर्भावास अटकाव घालण्यासाठी आरोग्य यंत्रणा जंगजंग पछाडत असली, तरी रुग्णांची संख्या मात्र वाढतच असल्याचे वास्तव आहे. १ जानेवारी २०१८ ते ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत आरोग्य विभागाने अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम या पाच जिल्ह्यांमधील १० हजार ६७९ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने घेतले. यापैकी २९४७ रुग्णांची एलिझा, तर ६७६७ रुग्णांची रॅपिड चाचणी करण्यात आली. रॅपिड चाचणीत ११०६ , तर एलिझा चाचणीत ३३१ रुग्ण दूषित आढळून आले. आरोग्य विभाग एलिझा चाचणीतील रुग्णांना पॉझिटिव्ह मानत असल्यामुळे पाच जिल्ह्यांत ३३१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आहे.अमरावतीमध्ये सर्वाधिक रुग्णपश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांपैकी डेंग्यूचे सर्वाधिक २२६ पॉझिटिव्ह रुग्ण अमरावती जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात ५८ रुग्ण, अकोला जिल्ह्यात ३६ रुग्ण, बुलडाणा आठ रुग्ण व वाशिम जिल्हा तीन रुग्ण असा क्रम आहे.गतवर्षीपेक्षा १०० टक्के वाढयावर्षी डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, रुग्णांची संख्या १०० टक्क्यांनी वाढल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. गतवर्षी १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीत अकोला विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये फक्त ३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. यावर्षी याच कालावधीत तब्बल ३३१ रुग्णांची नोंद आहे. रुग्णांच्या संख्येतील ही वाढ शंभर टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे सहायक संचालक, आरोग्यसेवा (हि.) डॉ. अभिनव भूते यांनी सांगितले.