अकोला: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. नागरिकांना घरातून निघण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बाहेर निघाल्यास सोशल डिस्टंन्सींग राखण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. दुकानांमध्येसुद्धा सोशल डिस्टंन्सींग राखावे लागत आहे; परंतु ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्यांकडून मात्र सोशल डिस्टंन्सींगसोबतच वाहतूक नियमांची ऐशीतैशी करण्यात येत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शहरात काही चालक सर्रास ट्रिपल सीट दुचाकी दामटत आहेत. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर अकोलेकरांनी स्वयंशिस्तीचे पालन करणे अपेक्षित असतानाही काही उत्साही महाभागांमुळे सोशल डिस्टन्सीगचा बोजवारा उडाला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टंन्सींग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यास वारंवार सांगितले जात आहे. अनेक ठिकाणी सोशल डिस्टंन्सींगचा नियम पाळल्यासुद्धा जात आहे; परंतु काही तरी कारणनिमित्ताने दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणाऱ्यांचा सध्या ऊत आलेला दिसून येत आहे. दुचाकीवर तिघे जण बसवून शहराचा फेरफटका मारल्या जात आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगला अर्थच उरला नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक चौकांमध्ये, प्रमुख मार्गांवर काही युवक सोशल डिस्टंन्सींगकडेच नाहीतर वाहतूक नियमांकडेसुद्धा दुर्लक्ष करून दुचाकींवर सर्रास ट्रिपल सीट फिरताना दिसत आहेत. ही गंभीर बाब आहे. यामुळे कोरोनासारखा भयंकर आजार रोखला तर जाणार नाही. उलट या आजाराला हे दुचाकींवर फिरणारे चालक आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे. विनाकारण दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये फिरून वाहतूक नियम व संचारबंदी कायद्याचा भंग करणाºयाविरुद्ध पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.
ट्रिपल सीट वाहन चालविणे आमचा हक्कच...संचारबंदी काळात ट्रिपल सीट वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. ट्रिपल सीटमुळे चालकाला वाहन चालविणे जड जाते. वाहनावरील नियंत्रण सुटून अपघातही होऊ शकतो. सोशल डिस्टंन्सींगसुद्धा पाळल्या जात नाही. पोलिसांनी गतवर्षी ट्रिपल सीट प्रवास करणाºया २४२0 वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली; परंतु आम्ही सुधारणार नाही, असा निर्धार दुचाकी, चारचाकी वाहनचालकांनी केला की काय? असे दिसून येत आहे.
ट्रिपल सीट वाहन चालविल्यामुळे वाहतूक नियमांचा तर भंग होतोच, शिवाय सोशल डिस्टंन्सींगसुद्धा राहत नाही. कोरोनासारख्या आजाराला हरवायचे असेल तर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सध्या डबल सीट दुचाकी चालविणेसुद्धा टाळावे. शहरात आम्ही वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी ५0 दुचाकीस्वारांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल.-गजानन शेळके, पोलीस निरीक्षकवाहतूक नियंत्रण शाखा