- संतोष येलकर
अकोला: पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाणंद रस्ते कामांसाठी नऊ महिन्यांपूर्वी शासनामार्फत २ कोटींचा निधी उपलब्ध झाला असला तरी; ८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील सातपैकी सहा तालुक्यातीलच पाणंद रस्ते कामांचे कृती आराखडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले असून, एका तालुक्यातील कामांचा आराखडा अद्याप प्रलंबित आहे. कृती आराखडे सादर करण्यास विलंब आणि कामांची निविदा प्रक्रिया अद्याप प्रलंबित असल्याने रेंगाळलेली जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांची कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शासनाच्या पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी गत मार्च २०१८ मध्ये शासनामार्फत २ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध निधी गत आॅगस्टमध्ये जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला. उपलब्ध निधीतून पाणंद रस्त्यांची कामे करण्यासाठी कामांचे कृती आराखडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत जिल्ह्यातील सातही तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) देण्यात आले; परंतु वारंवार पत्राद्वारे निर्देश देऊनही नोव्हेंबर अखेरपर्यंत तहसीलदार व गटविकास अधिकाºयांमार्फत पाणंद रस्ते कामांचे आराखडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेकडे प्राप्त झाले नाही. ८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील सहा तालुक्यातील पाणंद रस्ते कामांचे कृती आराखडे प्राप्त झाले असले तरी, एका तालुक्यातील कामांचा कृती आराखडा अद्याप प्राप्त झाला नाही. ‘जेसीबी मशीन’ आणि ‘पोकलेन’द्वारे पाणंद रस्त्यांची कामे करण्यासाठी निविदा प्रक्रियादेखील अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे नऊ महिन्यांपूर्वी निधी उपलब्ध असतानाही जिल्ह्यातील रेंगाळलेली पाणंद रस्त्यांची कामे सुरू होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. २८७ पाणंद रस्त्यांची कामे प्रस्तावित!जिल्ह्यातील सहा तालुक्यातील पाणंद रस्ते कामांचे कृती आराखडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेकडे सादर करण्यात आले. सहा तालुक्यांच्या या कृती आराखड्यांमध्ये २८७ पाणंद रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये अकोला तालुक्यात -२२, अकोट तालुक्यात -१५२, तेल्हारा तालुक्यात -६४, बाळापूर तालुक्यात -१७, पातूर तालुक्यात -१४ व मूर्तिजापूर तालुक्यातील १८ पाणंद रस्ते कामांचा समावेश आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील पाणनंद रस्ते कामांचा कृती आराखडा अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेकडे सादर करण्यात आला नाही.