अकोला : शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच रहिवासी वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी मोकाट गुरांनी उच्छाद मांडला आहे. मोकाट जनावरांमुळे अकोलेकर त्रस्त झाले असून, अशा जनावरांना पकडून त्यांना ठेवण्यासाठी मनपाकडे कोंडवाडे उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. निवडणुकीच्या काळात आश्वासनांची खैरात करणाºया सत्ताधारी भाजपाने व प्रशासनाने नागरिकांना भेडसावणाºया समस्यांकडे पाठ फिरवल्यामुळे अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.शहराच्या कोणत्याही कानाकोपºयात जा, रस्त्यांवर मोकाट जनावरांनी ठिय्या मांडल्याचे चित्र पहावयास मिळते. सकाळ असो वा दुपार जनावरांच्या त्रासापायी अकोलेकरांनी त्यांच्या मार्गात बदल केल्याचे बोलल्या जाते. मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, मुख्य बाजारपेठ तसेच प्रभागांमध्ये ठिकठिकाणी मोकाट जनावरांची संख्या पाहता शहरात गुराढोरांचे पीक फोफावल्याचा भास होत आहे. मूलभूत सुविधा हव्या असतील, तर त्याबदल्यात मनपाकडे कर जमा करणे अकोलेकरांचे नैतिक कर्तव्य आहे. अर्थातच, या कराच्या बदल्यात पाणी पुरवठा, रस्ते, पथदिवे, नियमित साफसफाई व इतर समस्या निकाली काढणे प्रशासनाकडून अपेक्षित आहे. मागील काही महिन्यांपासून प्रशासनाचे कामकाज मंदावल्याचे चित्र आहे. कोंडवाडा विभागात कार्यरत कर्मचारी हतबल ठरत असल्यामुळे की काय, रस्त्यांवर तसेच रहिवासी वस्त्यांमध्ये मोकाट फिरणाºया जनावरांचा त्रास सहन करण्याची वेळ नागरिकांवर ओढवल्याचे दिसून येते. मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यासाठी प्रशासनाकडे कोंडवाडे उपलब्ध नसल्याचे केविलवाणे चित्र समोर आले आहे.१३ ग्रामपंचायती अन् कोंडवाडा एक!नवीन प्रभाग वगळता शहरात विविध ठिकाणी अवघ्या सहा कोंडवाड्यांसाठी जागा शिल्लक आहे. जुने शहरातील शिवचरण मंदिरासमोर कोंडवाड्याची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली. अकोटफैलस्थित मच्छी मार्केटमधील कोंडवाडा बांधण्याची प्रक्रिया स्थानिक मच्छीविके्रत्यांमुळे ठप्प पडल्याची माहिती आहे. शहरालगतच्या १३ ग्रामपंचायती अंतर्गत २४ गावांचा मनपात समावेश झाला. १३ ग्रामपंचायतींपैकी केवळ शिवापूर ग्रामपंचायतमध्ये कोंडवाडा उपलब्ध होता.महापौर, आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष!विकास कामांसाठी निधीची कमतरता नसल्याचा दावा महापौर विजय अग्रवाल करतात. रस्त्यांवर फिरणाºया मोकाट जनावरांमुळे अकोलेकर प्रचंड वैतागले आहेत. आजरोजी एकच कोंडवाडा उपलब्ध असल्याचे पाहता महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ नवीन कोंडवाडे बांधण्यासाठी ठोस निर्णय कधी घेतात, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
नवीन प्रभागातील जागेवर अतिक्रमणशहरालगतच्या १३ ग्रामपंचायतींसह २४ गावांचा मनपात समावेश झाला. यापैकी बहुतांश तत्कालीन ग्रामपंचायती व गट ग्रामपंचायतींच्या इमारतीमध्ये मनपाने तात्पुरत्या स्वरूपात कार्यालयीन कामकाज सुरू केले आहे. काही इमारती अक्षरश: ओस पडल्या असून, त्या ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी गुरे, ढोरे बांधण्यासाठी अतिक्रमण केल्याची माहिती आहे. अशा इमारतींची पाहणी करून त्याठिकाणी कोंडवाड्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करण्यासाठी मनपाने पुढाकार घेण्याची गरज आहे.