उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसभर सोसाट्याचा वारा राहतो. मंगळवारी दुपारी २ वाजताच्या जवळपास वाऱ्याचा जोर जास्त असल्याने झाडाची फांदी पर्यटन केंद्रामधून जाणाऱ्या विद्युत तारांवर पडली. त्यामुळे तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन पर्यटन केंद्रामध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी विलंब न करता राउंड ऑफिसर प्रणाली धर्माळे यांनी घटनास्थळाचा आढावा घेऊन आग विझविण्यासाठी उपाययोजना केल्या. यावेळी वनविभागाकडे असलेल्या १० अग्निरोधक यंत्रांच्या साहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. वाऱ्याचा जोर अधिक असल्याने आगीने आणखी भीषण रूप धारण केले. आगीचे लोळ वाढत चालले होते. केवळ अग्निरोधक यंत्राने सतत दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. १४ तासांनंतर संपूर्ण आग विझविण्यास यश आले. यावेळी अग्निशमन दल उपलब्ध होऊ शकले नाही. यावेळी राउंड ऑफिसर प्रणाली धर्माळे, रेंज ऑफिसर धीरज मदने, वनरक्षक घुगे अविनाश, पी.जी. काशीदे, अतुल करोडपती, अनिल वानखडे, विठ्ठल बेलाड, वनमजूर व वनरक्षक अशा ३५ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे पातूर पर्यटन केंद्र बेचिराख होण्यापासून वाचले.
--बॉक्स--
अग्निशमन यंत्रणा कर्मचाऱ्यांविना
पातूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाकडे वाहन उपलब्ध आहे. मात्र, या दलाकडे फायर ऑफिसर फायरमॅन कर्मचारीच वर्ग अस्तित्वात नाही. कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या नसल्याने वाहन उभे आहे. वाहनाचा पाइपही अपुरा आहे. आग लागल्यानंतरही अग्निशमन वाहन कामात येत नसल्याने हे केवळ ‘शो पीस’ आहे का, असा प्रश्न पडला आहे.