अकोला: माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळातर्फे ८ सप्टेंबर रोजी सकाळी १0 ते ११ वाजेपर्यंत ज्ञान-विज्ञान परीक्षा होणार आहे. या परीक्षेला एकूण १७६ केंद्रावर १४ हजार ९१४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत.या परीक्षेमध्ये इ. पाचवी ते सातवी अ गट, इ. आठवी ते दहावी ब गट करण्यात आले आहेत. परीक्षेत ५0 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील. प्रश्न पाठ्यपुस्तक परिसरातील घटना, सामान्य ज्ञान यावर आधारित राहतील. ज्ञान-विज्ञान परीक्षेची ओएमआर उत्तर पत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. परीक्षेच्या सरावासाठी विज्ञान अध्यापक मंडळातर्फे विद्यार्थ्यांना आॅनलाइन चाचण्या व सराव देण्यात आला. या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक तालुक्यातील गुणानुक्रमे सर्वप्रथम येणाऱ्या ४0 विद्यार्थी असे जिल्ह्यातून २८0 विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा जिल्हा स्तरावर घेण्यात येईल. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची विज्ञान कार्यशाळेसाठी निवड होईल. या विद्यार्थ्यांना डॉ. होमी भाभा विज्ञान केंद्र मुंबई व मराठी विज्ञान परिषदेचे शास्त्रज्ञ मार्गदर्शन करतील. जिल्हा स्तरावरील परीक्षेतून अ व ब गटातून प्रथम अशा प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांना ५00 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल. (प्रतिनिधी)