अकोला : विद्यार्थ्यांसाठी लागणारी वह्या-पुस्तके, गणवेश इत्यादी साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची पालकांना सक्ती करता येत नाही. त्यामुळे अशी सक्ती केल्यास संबंधित खासगी शिक्षण संस्थाचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शनिवारी शिक्षणाधिकाऱ्यांना येथे दिले.विद्यार्थ्यांना लागणारी वह्या-पुस्तके, शालेय गणवेश व अन्य साहित्य शाळांकडूनच किंवा शाळेने नेमून दिलेल्या विक्रेत्याकडूनच खरेदी करण्याची सक्ती खासगी शिक्षण संस्थाचालकांकडून करण्यात येत असल्याची तक्रार पालकांच्या शिष्टमंडळाद्वारे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शिक्षण संस्थाचालक अशाप्रकारे सक्ती करू शकत नाही, तसा त्यांना अधिकार नाही, असे सांगत पाल्यासाठी आवश्यक असलेली वह्या-पुस्तके, गणवेश तसेच अन्य साहित्य पालक हवे तेथून खरेदी करू शकतात. त्यामुळे यासंदर्भात पालकांनी संबंधित संस्थाचालकांविरुद्ध शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे पालकमंत्र्यांनी पालकांच्या शिष्टमंडळाला सांगितले. तसेच यासंदर्भात पालकांची तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षणाधिकाºयांना दिले. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी वेळोवेळी आढावा घेऊन पालकांच्या तक्रारींचे निवारण करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
शाळेतून साहित्य खरेदीची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा! - बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 10:56 AM