लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्हय़ातील मूर्तिजापूर तालुक्यात केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.पाच वर्षांचा कालावधी संपणार्या जिल्हय़ातील अकोला, अकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, तेल्हारा, पातूर आणि मूर्तिजापूर या सातही तालुक्यांतील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या निवडणुकीत थेट जनतेतून निवड करावयाच्या सरपंच पदांसह ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू झाली. ग्रामपंचायतींची निवडणूक लढविणार्या उमेदवारांना ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरावयाचा असून, ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (प्रिंट) संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर करणे आवश्यक आहे. १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४.३0 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येतील आणि ऑनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जांची ‘प्रिंट’सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित तहसील कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दाखल करता येईल. ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्हय़ातील सातही तालुक्यांपैकी मूर्तिजापूर तालुक्यात केवळ एक उमेदावारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
तहसील कार्यालयात उसळली गर्दी!ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करताना लागणारे दाखले, प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची माहिती घेण्यासाठी शुक्रवारी अकोला तहसील कार्यालय परिसरात इच्छुक उमेदवारांसह सर्मथकांची गर्दी उसळली होती. काही इच्छुक उमेदवारांनी मतदार याद्यांच्या नकलादेखील घेतल्या. नागरिकांची गर्दी झाल्याने, तहसील कार्यालय परिसर मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.
सोनाळय़ात एक अर्ज दाखलमूर्तिजापूर : तालुक्यातील सोनाळा ग्रामपंचायतीच्या प्रभाग २ मधून अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ईश्वर दादाराव डाबेराव यांनी उमदेवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर पितृपक्षाचे सावट!ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली; मात्र, २0 सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष असल्याने, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदतीच्या शेवटच्या दोन दिवसांत २१ व २२ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर पितृपक्षाचे सावट आहे.