लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा ४0 हजार स्क्वेअर फूट भूखंड भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी संगनमताने संगणकात ऑनलाइन नोंद करून गजराज मारवाडी यांच्या नावे करून हडपला. या प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली आहे. ही चौकशीची फाइल आता पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्याकडे देण्यात येणार असून, बुधवारी पोलीस अधीक्षक स्वत: तपासणी करणार आहेत.अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २0 कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन भूखंड हडपण्याचा प्रताप करण्यात आला. सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, आतापर्यंत दोन अधिकारी व ११ कर्मचार्यांचे बयान नोंदविले. यासोबतच हा भूखंड हडप करणारा गजराज मारवाडी याची कोतवाल बुकाची नक्कलही काढली असून, यामध्ये मारवाडी हेच आडनाव वापरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी सिटी कोतवाली पोलिसांनी केली आहे; मात्र फौजदारी कारवाई करण्यासाठी आता या प्रकरणाची फाइल पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्याकडे देण्यात येणार आहे.
भूखंड घोटाळय़ाची चौकशी करण्यात आली असून, ही फाइल तपासण्यात येणार आहे. यामध्ये कसा घोळा घालण्यात आला, आरोपी कोण आहेत, हे जवळपास स्पष्ट झाले आहे; मात्र कावड बंदोबस्त तसेच अमरावती परिक्षेत्र कार्यालयात बैठका सुरू असल्याने ही फाइल तपासण्यास वेळ झाला असून, बुधवारी किंवा गुरुवारी या प्रकरणाची फाइल तपासण्यात येणार असून, पुढील कारवाई करण्यात येणार आहे.- एम. राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक, अकोला.