अकोला: रस्त्ये कामातील अपहार केल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली होती. अखेर या प्रकरणात राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध बुधवारी उशिरा रात्री सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल करून कागदोपत्री अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री बच्चू कडू यांनी १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ३ डिसेंबर रोजी सिटी काेतवाली पोलिसांकडे करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे वंचित तर्फे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता १५६ (३) अंतर्गत याचिका न्यायालयात दाखल केली होती.
काय आहे तक्रार?
जिल्हा नियोजन समितीने वार्षिक आराखडा तयार करताना जि. प. कडून ग्रामीण रस्ते दुरुस्ती, नवी कामे, पुलांसाठी प्रस्ताव मागितले हाेते. त्यानुसार १० मार्च २०२१ रोजी झालेल्या जि. प. च्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन प्रस्ताव समितीकडे पाठविण्यात आला होता. मात्र, जि. प. च्या या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल केले. शासनाच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री कडू यांनी यंत्रणांचा गैरवापर करून निधी वळविला. शासनाच्या १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने बोगस कागदपत्र तयार केले, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला हाेता. या कलमांनुसार गुन्हा दाखल पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध बुधवारी कोतवाली पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी भादंवि कलम ४०५ (फौजदारीपात्र न्यासभंग, ४०९, लोकसेवकाने फसवणूक करणे), ४२०(फसवणूक), ४६८(खोटे कागदपत्रे तयार करणे), ४७१(खाेट्या कागदपत्रांचा वापर करणे) नुसार गुन्हा दाखल केला. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी फाैजदारी संहिता प्रकिया १५६ (३) च्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.