आलेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवडणूक गुरुवारी घेण्यात आली. निवडणूक पार पडल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच गोपाल महल्ले व त्यांच्या समर्थकांनी गावातून जल्लोषात, वाजतगाजत मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या समर्थक, कार्यकर्त्यांनी मास्क लावलेले नव्हते. फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्षच करण्यात आले. चान्नी पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराच्या डोळ्यांदेखत, जल्लोषात आणि कोरोना प्रतिबंधक नियमांकडे कानाडोळा करीत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीला ठाणेदाराने कुठेही अडथळा,प्रतिबंधसुद्धा केला नाही. पोलिसांच्या साक्षीने, कोरोना प्रतिबंधक नियमांची ऐशीतैशी करून जंगी जल्लोष करण्यात आला. सरपंचाच्या मिरवणुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार जमावबंदी कायद्यानुसार नवनिर्वाचित सरपंच गोपाल गणपत महल्ले यांच्यासह १५-२० जणांविरुद्ध भादंवि कलम १८८, २६९, १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
निवडणुकीचा जल्लोष करणे अंगलट, नवनिर्वाचित सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:19 AM