अकोला: शहरात नझुल क्षेत्रातील तात्पुरत्या वापरासाठी दिलेल्या ह्यबी क्लासह्णअंतर्गत येणार्या खासगी जागांचा समावेश आता 'ए क्लास'मध्ये करण्यावर शासनाने शिक्कामोर्तब केले. गुरुवारी मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी ही घोषणा केल्याने शहरातील सिंधी बांधवांच्या हक्काच्या जागेचा मार्ग मोकळा झाला आहे. फाळणीच्या काळात अकोला शहरात मोठय़ा संख्येने सिंधी बांधव दाखल झाले. त्यांना राहण्यासाठी शासनाने सिंधी कॅम्पमध्ये जागा दिली. सदर जागेचा समावेश नझुल विभागाच्या ह्यबह्णश्रेणीमध्ये असल्याने ही जागा केवळ भाडे पट्टयावर देण्याची किंवा घेण्याची तरतूद आहे. शासनाकडून विशिष्ट उद्देशासाठी प्राप्त झालेली जागा कायमस्वरूपी नसल्याने तसेच जागेचा मालकी हक्क नसल्याने जमीन गहाण ठेवण्यासह विविध व्यवहार करताना सिंधी बांधवांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. सिंधी समाजाची ही अडचण सोडविण्यासाठी भाजपाचे गटनेता हरीश आलीमचंदानी यांनी यासंदर्भात पालकमंत्री डॉ.रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला. त्यावर गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब करीत 'ब'श्रेणी जागेचा समावेश 'अ'श्रेणीमध्ये करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सिंधी बांधवांसह या भागातील नागरिकांना जागेचा मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सिंधी बांधवांच्या हक्काच्या जागेचा मार्ग मोकळा
By admin | Published: December 04, 2015 3:00 AM